सावर्डे : १६ जानेवारी, २०२४ रोजी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक , शिक्षणमहर्षि तथा सहकार महर्षि स्व.गोविंदराव निकम यांची ९० वी जयंती जिल्ह्यात एक महोत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे.
या जयंती मसोहळ्यानिमित्त, चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील स्व.गोविंदरावांच्या स्मृतिगंध या समाधी स्मारकाच्या परिसरात भव्य मंडप, हजारो खुर्च्यां मांडण्यात आल्या असून आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. समाधी स्मारक, परिसरातील भगवान शंकराचे मंदिर, स्मृतिगंध संग्रहालय आदी ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले आहे. ता.१६ आणि १७ जानेवारी असे दोन दिवस येथे या जयंती सोहळ्यानिमित्त सकाळी आणि रात्री येथे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या दोन दिवसांत हजारो लोक, स्व.गोविंदरावांवर आणि निकम परिवारावर प्रेम करणारे, माजी विद्यार्थी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते , नेते या समाधी स्थळाला भेट देणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने यांंच्या "मी कसा घडलो " आणि मॅब एव्हिएशन प्रा.लि.चे संस्थापक यांच्या , "व्यवसायपंथे चालावे" या व्याख्यानांनी होणार आहे.