
सावंतवाडी : बांद्याच्या सांस्कृतिक, वैचारिक व विकासात्मक विचारधारेला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून चालना देण्याचे काम हे कै. प्रवीण मांजरेकर यांनी आपल्या कार्यकाळात केले. आपल्या लेखणीची ताकद त्यांनी नेहमीच समाजाच्या उद्धारासाठी खर्च केली. त्यांचे कार्य बांदावासियांच्या नेहमीच स्मरणात राहील. त्यांना अभिप्रेत असलेले समाजप्रबोधनाचे कार्य पुढे निरंतर सुरु ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे भावोद्गार अनेकांनी काढले.
येथील नट वाचनालयच्या सभागृहात कै. प्रवीण मांजरेकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, आशुतोष भांगले, नट वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, व्यापारी सुरेश गोवेकर, ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी अशोक परब, दीपावली शो टाइमचे सदस्य राजेश पावसकर, नट वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, पत्रकार नीलेश मोरजकर, प्रवीण परब, मयूर चराटकर, मंगल कामत, जय भोसले, अजित दळवी, विराज परब आदी उपस्थित होते.
कै. मांजरेकर यांच्या पत्रकारितेचा बराचसा काळ हा बांद्यात गेला. त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडत सडेतोड लिखाण केले होते. येथील सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या दीपावली शो टाईमचे ते परीक्षक होते. अनेक नाटकांच्या दिग्दर्शनाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. अनेक नवोदित पत्रकारांना ते मार्गदर्शन करत होते.बांद्याच्या सांस्कृतिक व वैचारिक जडणघडणीत त्यांचे योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे. यावेळी सगळ्या श्रोत्यांनी मांजरेकर यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.