प्रतिकूल परिस्थितीला दिला तगडा जबाब

बालपणीच हरवलं आई वडिलांचं छत्र ; प्रथमेश जोशीने काबीज केले MPSCचं शिखर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 22, 2025 11:40 AM
views 348  views

सिंधुदुर्गनगरी :  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कसाल वजरी वाडी येथील प्रथमेश उमेशजोशी या युवकाने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करीत यशाला गवसणी घातली आहे. त्याची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राप्त परिस्थितीशी झुंज देत त्याने मिळवलेले यश कौतुकास पात्र ठरले आहे. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. कोणतेही पाठबळ नसताना त्याने मिळवलेले यश  परिसरात लक्षवेधी ठरले आहे.

आई-वडिलांचे छत्र नसताना त्याने हे यश मिळवले किती कठीण प्रसंगातून मार्गक्रमण करीत आपल्या यशापर्यंत पोहोचत यशाची कमान उभारली. आयुष्यच काबाडकष्टात गेलं. त्याचे वडील उमेश याबाबत परिसरातील मित्रपरिवाराला सांगायचे की आपली मुलं सरकारी नोकरीत लागत नाहीत कारण आपल्याकडे तेवढा पैसा नाही. आपण मुलांना जास्त शिकवू शकत नाही. मात्र, त्यांच्याच मुलाने पैसा नसताना सुद्धा कसं यश मिळवता येतं हे त्याने सिद्ध करून दाखवल. ही बाबनिश्चितच प्रेरणादायक अशी ठरली आहे. त्याची आई पण म्हणायची प्रथमेश कुठेतरी चांगल्या लोकरीला लागायला पाहिजे आईची इच्छा ही त्याने पूर्ण केली. या त्याच्या यशात बहीण कल्पना व तिच्या नवऱ्याने चांगली साथ दिली पाठबळ दिले. आजीनेही नातवासाठी कष्ट घेतले. प्रथमेशची काळजी मुलासारखी घेतली. कसली उणीव जाणू दिली नाही. या अशा जीवनप्रवासातून वाट काढत त्याने यशाला गवसणी घातली. आज त्याने मिळवलेले यश त्याच्या आजीने भरभरून पाहिले. तोही आजीला नतमस्तक झाला त्याच्या या यशाबद्दल वाडीतील मित्र परिवाराने त्याचा यथोचित सत्कार केला. तेव्हा अनेकांना कंठ दाटून आला. अनेक जण भावनाविवश झाले.

प्रथमेशने मिळवलेले यश हे काही सहजासहजी मिळविलेले नाही. सातत्याने अतोनात कष्ट घेतले आणि या कष्टाच्या जोरावरच त्याने यश गाठले. त्याच्या यशाबद्दल वाडीत गुलाल उधळला. त्याचा सत्कार केला. त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानेही नम्रपणे सत्कार स्वीकारला. सर्वांच्या सहकार्याबद्दलही आभार मानले. यावेळी कसाल गावचे सरपंच राजन परब, ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर, माजी सरपंच नीलिमा वाडकर, भादवणकर सर, रामचंद्र जगताप, गणेश परकर, सत्यवान म्हसकर, अशोक पारकर, बाबी हींदळेकर, बाबू वाडकर, वर्षा जगताप, महेश जगताप यांच्यासह  वाडीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.