
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरवाचनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ, कुडाळ यांच्या विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले तालुकास्तरीय वाचक स्पर्धा झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रसाद खडपकर, विद्या परब आणि विशाखा वेंगुर्लेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरावर होणाऱ्या वाचक स्पर्धेसाठी या तिन्ही विजेत्यांची निवड झाली आहे.
वेंगुर्ले येथील या स्पर्धेसाठी 'पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती' हा विषय होता. यात प्रसाद खडपकर यांनी 'देवकी' पुस्तकाचे, विद्या परब यांनी 'उत्तरायण' तर विशाखा वेंगुर्लेकर यांनी 'माहिमची खाडी' या पुस्तकावर परीक्षण केले. या स्पर्धेची पारितोषिके नगरवाचनालयाचे कार्योपाध्यक्ष राजेश शिरसाट यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेचे परीक्षण अनिल सौदागर, कैवल्य पवार आणि प्रा. महेश बोवलेकर यांनी केले. प्रसाद खडपकर हे उत्तम वक्ते असून ते दर्जेदार अभिनयदेखील साकारतात. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.