प्रमोद जठारांनी काजू बद्दल अभ्यास नसताना बेताल वक्तव्य करू नयेत

विलास सावंत स्पष्टच बोलले
Edited by:
Published on: March 17, 2024 06:33 AM
views 147  views

सावंतवाडी : माजी आमदार प्रमोद जठारांना आम्हा शेतकरी संघटनांकडून एक सल्ला आहे की ज्या काजू पिकाबद्दल आपल्याला अ आ ई सुद्धा माहीत नाही त्या काजू पिकाबद्दल आपण अभ्यासही न करता बेताल वक्तव्य करू नका असा सल्ला सावंतवाडी दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिला आहे.

सावंत म्हणाले, प्रमोद जठार यांच्या बातम्या आम्ही वाचतो आपल्याला ओला काजू आणि तयार झालेला सुका काजू यातील फरक सुद्धा कळत नाही त्यामुळे आपण काजू बद्दल न बोललेलं बरं. ज्याचा काजू पिकाशी काही संबंध नाही, अभ्यास नाही त्यांनी फक्त प्रसार माध्यमांना धरून उगीच निवेदन घ्यायचं मंत्र्यांना भेटून फोटो काढायचे. आणि पब्लिसिटी करायचं हे तंत्र आता जुनं झालं. लोक शहाणे झालेत यंदाच्या इलेक्शन मध्ये नोट तुमची घेतील पण वोट दुसरीकडे जाईल हे लक्षात ठेवा. अस म्हणता आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून खासदारकीला उभे रहा आमचं काही म्हणणं नाही मात्र त्यावेळी शेतकरी काय करतील ते पहा असा इशारा सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे माजी आमदार जठार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या तीन घटक पक्षातील तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून व मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत तुमच्यातच ताळमेळ नाही त्यामुळे उगीच दिशाभूल करणारी वक्तव्य करू नका . जठार साहेब तुम्ही १५० रुपये प्रति किलो काजू बी ला मिळणार असा दावा केला होता, मंत्री दीपक केसरकर यांनी तर १३५ रुपये वर्तमानपत्रांतून व आपल्या सभातून जाहीर केले तर आपले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दहा रुपये अनुदान देणार म्हणजे मार्केट रेट ११० रुपये असेल तर १२० रुपये देणार असं जाहीर केलं त्यामुळे तुमच्यातच हा फरक आहे त्यामुळे वक्तव्य न करणे इष्ट होईल, असे सावंत यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू बोर्डासाठी फडणवीस हे अर्थमंत्री असताना दोनशे कोटी रुपये जाहीर केले त्याचवेळी काजू कारखानदारांना झुकतं माप देऊन १३४५ कोटी रुपये जाहीर केले त्यातूनच आपल्याला शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा आहे हे सिद्ध झालं. दहा रुपये प्रति किलो अनुदान ही शेतकऱ्यांना तुमची भीक नको आहे तर हमीभाव आमचा हक्क आहे आणि ते हक्कासाठी आपलं सरकार काय करत असेल तर ते करून दाखवा आणि तुम्ही उगीचच काजू बद्दल बातम्या देऊन तुम्ही तुमच्याच पक्षाचे नुकसान करत आहे हे तुमच्या लक्षात येत नाही.

पंधरा दिवसांपूर्वी वैभववाडीच्या बाजारात बाजारादिवशी एक शेतकरी कंपनी १२० रुपयाने काजू घेत होती त्यावेळी तुमच्या अधिपत्याखाली असणारी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती ही ११० रुपये किलोने काजू खरेदी करत होती. एक प्रायव्हेट कंपनी चढ्या भावाने खरेदी करते आणि सरकारची एजन्सी पाड्या भावाने खर्च करते यातच तुमचं शेतकऱ्यांचं भलं करण्याचं काय ते कळलं निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याचे भल करायला जाल तर फसाल कारण आता शेतकरी जागा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाभर झालेली धरणे आंदोलने, दोडामार्ग येथे झालेला रस्ता रोको आंदोलन यामुळे आपण जागे झाला नसाल तर येत्या निवडणुकीत आपली झोप उडविली जाईल याची जाण ठेवा. आणि जोपर्यंत भारतात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस आहे तोपर्यंत गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही हे सर्वांनी जाणलं आहे याची प्रचिती तुम्हाला येत्या निवडणुकीत निश्चित येईल तोपर्यंत जरा दमाने घ्या काजूवर बोलण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा हक्क नाही आणि विनंती करतो की आपण खासदारकीला उभे रहा आणि शेतकरी काय करतात हे पहा असा इशारा विलास सावंत यांनी दिला आहे.

कधीकाळी प्रमोद जठार हे आमदार होते आणि ते ज्या पक्षाचे म्हणजे भाजपचे आहेत त्या पक्षाचे मुख्यमंत्री गोव्यात १५० रुपये सपोर्ट प्राईस पर्यंत शेतकऱ्यांना देतात ते कुठच्या आधारावर देतात याचं संशोधन प्रमोद जठार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कराव . खाजगीत बोलताना शासन देऊ शकत नाही असं कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य करायचं आणि पेपर मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करायची यापेक्षा आपण अभ्यास करा आणि आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या ज्या समिती आहेत त्यांच्यावर अभ्यासू माणसं सभापती म्हणून नेमा त्यामुळे जिल्ह्याचे भलं होईल. उगीच जिल्ह्याचा भलं करणाऱ्या समित्यांवर अनपड कार्यकर्त्यांची खोगीर भरती करू नका. या बेसिक गोष्टींवर प्रमोद जठारांना लक्ष टाकण्याची खरी तर गरज आहे असे विलास सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.