
सिंधुदुर्ग : पोस्ट ऑफिसमार्फत काढलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेमुळे कणकवली येथील एका गरीब कुटुंबाला जगण्यासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. वीमाधारक जनार्धन धाकू कोकरे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबाला वीम्याच्या दाव्याचे २ लाख रुपये कणकवली पोस्ट ऑफिसमार्फत आदा करण्यात आले.
असरोंडी गावचे रहिवासी असलेले श्री. जनार्धन धाकू कोकरे यांनी पोस्ट ऑफिसमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेची पॉलीसी घेतली होती. ज्या अंतर्गत वार्षिक मात्र रु. ३३०/- मध्ये त्यांना २ लाख रुपयांचे वीमा संरक्षण प्राप्त झाले. दिनांक २३.११.२०२४ रोजी वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नी श्रीम. वंदना कोकरे यांच्यावर ३ मुलींच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली. तेंव्हा पोस्ट ऑफिसमार्फत त्यांच्या पतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेची पॉलीसी घेतल्याचे त्यांना समजले. कणकवली पोस्ट ऑफिसमधील पोस्टमास्तर श्री. गिरीश कामात व सहा. पोस्टमास्तर श्री. अशोक गावडे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेत, दिनांक २५.०१.२०२५ रोजी दाव्यासाठी प्रस्ताव संसद मार्ग नवी दिल्ली यांचेकडे पाठविला. सदर दावा १८.०२.२०२५ रोजी मंजूर करण्यात आला व मयत श्री. जनार्धन कोकरे यांची वारस पत्नी श्रीम. वंदना कोकरे यांचे पोस्ट खात्यात रु. २ लाख २८.०२.२०२५ रोजी जमा करण्यात आले. कुटुंबाला अशा परिस्थितीत मिळालेली ही रक्कम आर्थिक पाठबळ देईल व सावरण्यासाठी मदत करेल, पोस्ट ऑफिस कणकवली मधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल श्रीम. कोकरे यांनी धन्यवाद व्यक्त केले.
पोस्ट ऑफिसमार्फत भारत सरकारच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जातात. बचत योजनासोबतच सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना या महत्वाच्या दोन जन-सुरक्षा योजना पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक जीवन विमा योजना आहे, जी १८ ते ५० वयोगटातील लोकांसाठी आहे. या योजनेत, नैसर्गिक किंवा अपघाती कारणामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांचे संरक्षण मिळते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक चालू दरानुसार रु. ४३६/- इतका हप्ता भरावा लागेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही १८-७० वयोगटातील लोकांसाठी एक अपघाती विमा योजना आहे, ज्याअंतर्गत विमेधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विमा संरक्षण मिळते, अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 1 ते 2 लाख रुपये मिळतात. या योजनेसाठी वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. या जन सुरक्षा योजनांचा जिल्ह्यातील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी डाकघर अधीक्षक, सिंधुदुर्ग विभाग कुरळपकर यांनी केले.