शास्वत व दर्जेदार अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेती करा : सुधीर सावंत

Edited by:
Published on: March 15, 2024 09:07 AM
views 85  views

सिंधुदुर्गनगरी : विषमुक्त शेतीसाठी क्रांतिकारी अभियान राबाविणार असे आज ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरे करण्यात आले. या निमित्ताने ओरोस येथे आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करून नैसर्गिक शेती प्रदर्शन, नैसर्गिक शेती कार्यशाळा, भरडधान्य लागवड कार्यशाळा, औद्योगिक विकास कार्यशाळा, भरडधान्य पाककला स्पर्धा, बांबू लागवड कार्यशाळा, वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण उपाययोजना, शिवार फेरी इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना कृषी भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

देशात नैसर्गिक शेतीची चळवळ उभी करून महाराष्ट्रात विशेषकरून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान करण्यास भाग पाडले. हे अभियान आता महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्यात चालू झाले आहे. आपल्या जिल्ह्यात या अभियाना द्वारे 11 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा विभागा मार्फत याची अंमलबजावणी चालू आहे.

येत्या तीन वर्षात 15 हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात शास्वत व दर्जेदार अन्न सुरक्षिततेसाठी नैसर्गिक शेती हाच उत्तम पर्याय आहे. विषारी रसायनांपासून मुक्ती मिळण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण अबाधित राखण्यासाठी ही शेती महत्त्वाची आहे. नैसर्गिक शेती अभियानाद्वारे शेतकऱ्यांकडे जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राची उभारणी करून नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी किर्लोसकर उद्योग समूहाची मदत घेण्यात येणार आहे. शेतीसाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरविण्यासाठी फूड व लँड आर्मीची संकल्पना राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.