'सावर्डे'च्या विद्यार्थ्यांना कुंडीतील बागकामाचे धडे

Edited by: मनोज पवार
Published on: March 19, 2025 16:39 PM
views 132  views

सावर्डे : पर्यावरणीय व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष शेती विषयी कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित व्हावे व निसर्गाशी भेट संवाद साधण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी निर्माण करण्यासाठी गांधी तीर्थ जळगाव यांचे उपक्रमांतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कुंडीतील बागकाम हा अनोखा उपक्रम या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आला आहे.

ज्या वयात मुले बराचसा वेळ तंत्रज्ञानाशी संवाद साधण्यात घालवतात, त्याच वयामध्ये राबवलेल्या या कुंडीतील बागकाम उपक्रमामुळे विद्यार्थी ताजेतवाने व आवश्यक संतुलन प्राप्त केलेले आढळतात. मातीची थेट संबंध, विविध साधनांची माहिती व जिवंत वनस्पतीचे संगोपन करून नैसर्गिक जगाशी पुनरसंचित होण्याची जबाबदारीची भावना, जागरूकता व पर्यावरणाबद्दल कौतुक निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आनंददायी शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामुळे शाळेचा सौंदर्यशील विकास होण्यास मदत झाली. विविध कार्यक्रमात या कुंडीतील बागकामातून तयार झालेल्या शोभिवंत रोपांची मांडणी करून कार्यक्रमाचे व शाळेचे सौंदर्य वाढवण्यासह सावर्डे परिसरातील सामाजिक विविध कार्यक्रमात त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.

रिक्षा संघटना सत्यनारायण महापूजा, वाहक संघटना, गणेशोत्सव अशा विविध सार्वजनिक कार्यक्रमात कुंडीतील बागकामाच्या माध्यमातून तयार झालेल्या शोभिवंत झाडांचा वापर करून त्या कार्यक्रमाचे सौंदर्य वाढवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले जात आहे व समाजामध्ये या बागकामाचे महत्व पटवून देण्याचा व्यापक प्रयत्न सावर्डे विद्यालयाच्या वतीने केला जात आहे. पालक सहभागातून हा उपक्रम व विद्यार्थ्यांची सर्जनशीलता समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशालेमार्फत होत आहे. इयत्ता अकरावी एमसीव्हीसी व सातवीच्या 155 विद्यार्थ्यांनी नियमित या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून शोभिवंत वनस्पतींचे निगा राखण्याचे काम केले आहे. या उपक्रमात शिल्पा राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक सहभाग घेतला.

   विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी अभिनंदन केले आहे.