
सिंधुदुर्गनगरी : भारतीय डाक विभागातर्फे या वर्षी दिनांक 07ऑक्टोबरते 11ऑक्टोबरया कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात 07 ऑक्टोबररोजी टपाल व पार्सल दिवस साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे व दिनांक 09 ऑक्टोबर “जागतिक टपाल दिन” साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार डाक डाक विभागातर्फे केला जाणार आहे.
या वर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “150 years of enabling communication and empowering people across nations”.म्हणजेच “संप्रेषण सक्षमीकरण व राष्ट्रातील लोकांच्या सशक्तिकरणाची 150 वर्षे” अशी आहे. या अंतर्गत बदलत्या डिजिटल युगातील भारतीय टपाल विभागाची नवीन भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न डाक विभागामार्फत केला जाणार आहे. या वर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. यात सिंधुदुर्ग विभागामार्फत “डाक सामुदायिक विकास कार्यक्रम” अंतर्गत पोस्टाच्या सर्व सेवा व सुविधा एकाच दिवशी, एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष “डाक-मेळावा” (DCDP Camp) चे आयोजन जिल्ह्यातील निवडक 12 गावांमध्ये केले जाणार आहे. तसेच डाक विभागामार्फत ग्रामीण भागातील लोकांना आधार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आधार अद्यतन व नुतनीकरण सेवा आधार कॅम्पच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग पूर्णपणे सज्ज असुन खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन विभागामार्फत करण्यात आले आहे.दिनांक 07 ऑक्टोबर रोजी टपाल व पार्सल दिवस,08 ऑक्टोबर-फिलॅटेली दिवस, 09 ऑक्टोबर -जागतिक टपाल दिवस, 10 ऑक्टोबर-अंत्योदय दिवस व 11ऑक्टोबर-वित्तीय सशक्तीकरण दिवस.
मागील काही वर्षात अनेक नवनवीन योजना डाक विभागामार्फत राबविल्या जात आहेत. यात बचत बँक, डाक जीवन वीमा योजनांचे संगणकीकरण, इंडीया पोस्ट पेमेंट बँक, आधार सेवा, कॉमन सर्व्हिस सेंटर, महिला सन्मान योजना, आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस अशा विविध योजना व सुविधा नव्याने राबविल्या जात आहेत. सोबतच ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 316 ग्रामीण टपाल कार्यालये संपूर्णपने ऑनलाईन करण्यात आली आहेत. एकेकाळी मनी ऑर्डरचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्याची बहुतांश अर्थव्यवस्था पोस्ट खात्यावर अवलंबून होती. कालांतराने यात बरेच बदल झाले असले तरी आजही जिल्ह्यातील नागरिकांना पोस्टबद्दल असलेली आपुलकी व विश्वासाहृता पोस्ट खाते आजही टिकवून आहे. नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात पोस्ट खात्यामार्फत 25 हजार पेक्षा अधिक बेसिक सेविंग खाते शून्य रुपयांमध्ये उघडून दिले आहेत व या खात्यांमध्ये लाडकी बहिण योजनेचे हप्ते देखील जमा झाले आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधिक्षक श्री. मयुरेश कोले यांनी दिली. तसेच डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा व राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.