LIVE UPDATES

अर्ज न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळण्याची शक्यता

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 25, 2026 18:52 PM
views 63  views

सिंधुदुर्गनगरी : मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती देऊन शुद्धीकरण अर्ज भरून देणे आवश्यक असून, अर्ज न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सध्या जिल्ह्यात ६ लाख ८८ हजार १४ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदींच्या मॅपिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

३० जूनपासून घराघरांत पडताळणी- सध्या कर्मचारी प्रशिक्षण, साहित्य छपाई आणि पूर्वतयारीची कामे सुरू असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. यावेळी शुद्धीकरण अर्ज भरून घेऊन संबंधित मतदाराची स्वाक्षरी घेतली जाणार आहे. मतदार घरी नसल्यास कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडून आवश्यक माहिती घेऊन अर्ज भरला जाणार असल्याचे धोडमिसे यांनी सांगितले.

मतदार नसल्यास तीन वेळा भेट- मतदार घरी आढळून न आल्यास बीएलओ संबंधित पत्त्यावर तब्बल तीन वेळा भेट देणार आहेत. तरीही आवश्यक माहिती अथवा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नाव वगळले गेले तरी नियमानुसार पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध राहणार आहे. मात्र त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज भरून देणे आवश्यक आहे.

ऑक्टोबरमध्ये अंतिम मतदार यादी- विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर ५ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींची सुनावणी करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक-

▪ २० ते २९ जून – कर्मचारी प्रशिक्षण व पूर्वतयारी

▪ ३० जून ते २९ जुलै – बीएलओंच्या घरोघरी भेटी व अर्ज संकलन

▪ २९ जुलैपर्यंत – मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

▪ ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर – दावे व हरकती दाखल

▪ ५ सप्टेंबर – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

▪ ७ ऑक्टोबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध