
सावंतवाडी : कलंबिस्त कदमवाडी जळीचे कोंड या ठिकाणी बांधण्यात आलेली मोरी संदर्भात निष्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे गावातील जागरूक नागरिकांनी या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले व श्री. पाटील यांची भेट घेतली. यावेळी श्रीमती इंगवले यांनी निश्चितपणे या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल, जर काम निकृष्ट दर्जाचे असेल तर संबंधित ठेकेदाराकडून ते करून घेतले जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष उदय भोसले, गुरुदत्त कामत, विजय कदम, भाई सावंत, शाम कलंबिसकर, राजेश पास्ते आदी उपस्थित होते. जळीचे कोंड येथे ही मोरी उभारण्यात आली आहे. या मोरीचे काम दर्जेदार नाही. त्यामुळे भविष्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे धडक दिली.










