मंडणगड बसस्थानकाची दुरवस्था, प्रवाशांची गैरसोय

Edited by: मनोज पवार
Published on: August 22, 2025 20:20 PM
views 40  views

मंडणगड - मंडणगड बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, आगार व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः यंदाच्या पावसाने बसस्थानकाच्या परिसरात मोठे खड्डे पडले आहेत आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था इतकी वाईट आहे की ते कायमस्वरूपी बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

मंडणगड बसस्थानकाची इमारत सुमारे ४० वर्षांहून अधिक जुनी आहे. याच काळात बांधलेल्या दापोली, खेड आणि चिपळूण येथील बसस्थानकांचे नूतनीकरण झाले असताना मंडणगड बसस्थानकाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापनाचा भर बसस्थानकातील जागेचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्यावर आहे. बसस्थानकाची मोक्याची जागा असल्यामुळे दुकाने भाड्याने देऊन महसूल मिळवण्यावर व्यवस्थापनाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या प्रयत्नांमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या बसस्थानकाच्या आवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. जुन्या पत्र्याच्या शेडमध्येही अनेक समस्या आहेत. दरवर्षी केवळ डागडुजी केली जाते, पण नव्या इमारतीची तातडीने गरज आहे.

शहरातील एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह मोडतोडीमुळे वापरायोग्य राहिलेले नाही. याबाबत येथील आगार व्यवस्थापक एम.पी. जुनैदी यांच्याशी संपर्क साधला असता, खड्डे बुजवण्याकरिता निविदा काढण्यात येणार असल्याचे, तसेच नवीन स्वच्छतागृहाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहाचे काम लवकरच सुरू होईल असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांना यंदा अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. तालुक्यात दाखल झाल्यावर रस्त्यात खड्डे, बसस्थानकात खड्डे आणि उतरल्यावर स्वच्छतागृहाचा अभाव यामुळे आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यवस्थापनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.