राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकारात झोकून दिले पाहिजे : गजानन गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: November 17, 2023 19:22 PM
views 147  views

सावंतवाडी : सहकाराच्या माध्यमातून रोजाराभिमुख विकास होवू शकतो. त्यासाठी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकारात झोकून दिले पाहिजे. त्यासाठी सहकार चळवळ महत्त्वाचा भाग ठरवून गावागावात वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मिती होवू शकते असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक गजानन गावडे यांनी व्यक्त केला.७० वा अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळाच्या वतीने राज्य सहकारी संघ पुणे यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक सहकार्याने सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्यावतीने आयोजित सहकार सप्ताह निमित्त श्री. गजानन गावडे बोलत होते.

संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संचालक शशिकांत गावडे, अभिमन्यू लोंढे, जिल्हा बँक विकास अधिकारी विश्वनाथ डोर्लेकर, सहकारी संघ शिक्षणाधिकारी मंगेश पांचाळ, संचालक प्रमोद सावंत, ज्ञानेश परब, भगवान हिराप, विनायक राऊळ, भगवान जाधव, प्रवीण देसाई, दत्ताराम कोळमेकर, आत्माराम गावडे, रश्मी निर्गुण, व्यवस्थापक महेश परब  आणि मान्यवर उपस्थित होते.

संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे म्हणाले, सहकार सप्ताह साजरा होत असताना सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थांना पाठबळ मिळाले पाहिजे. सहकारातील ग्राहक, दुग्ध व शेतकऱ्यांच्या संस्थाना अनुदान देऊन उभारी दिली पाहिजे. दुग्ध व्यवसायात सहकार तत्वावर काम केल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकू शकतो हे समोर आले आहे. त्यामुळे सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी भरपूर वाव आहे. मात्र झोकून देऊन काम केले तरच रोजगार, उत्पादनाला बाजारभाव मिळवून देऊ शकतो.

जिल्हा बँकेचे विकास अधिकारी विश्वनाथ डोर्लेकर व संघाचे तज्ज्ञ संचालक अभिमन्यू लोंढे यांनी विचार मांडले. यावेळी संघाचे व्यवस्थापक महेश परब यांनी स्वागत तर सहकार मंडळाचे शिक्षणाधिकारी मंगेश पांचाळ यांनी सुत्रसंचलन व प्रास्ताविक केले.