LIVE UPDATES

वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 28, 2026 15:00 PM
views 32  views

कुडाळ : वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला. आरोग्य केंद्राचे अध्यक्ष रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या मोहिमेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी  पावसकर यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे थेंब (डोस) पाजून मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांशी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना रुपेश पावसकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, "आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील एकही बालक पोलिओ डोस मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची आरोग्य विभागाने आणि कर्मचाऱ्यांनी चोख खबरदारी घ्यावी. जे पालक किंवा ग्रामस्थ सध्या काही कारणास्तव आपल्या बालकांसह बाहेरगावी गेले आहेत, त्यांच्याशी तातडीने संपर्क साधावा. त्यांनी आपल्या बालकाला तिथे पोलिओची लस दिली आहे की नाही, याची खात्रीशीर माहिती करून घ्यावी."

पुढे बोलताना त्यांनी सर्वांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. "आपला जिल्हा पोलिओमुक्त ठेवणे ही केवळ आरोग्य विभागाची नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओसोबतच इतर संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने अगोदरच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात," अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या शुभारंभ प्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.