
मंडणगड : रत्नागिरी येथे कार्यालयीन बैठकीकरिता चाललेल्या मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे खेड दस्तुरी येथे अपघातात जखमी झालेल्या मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील कामाने दाम्पत्याचे प्राण वाचले. २४ मे २०२५ रोजी खेड दस्तुरी येथे दुपारी सव्वा दोन वाजता घडलेल्या या अपघातातबाबत प्राप्त माहीतीनुसार मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन गवारे हे त्यांचे गाडीचे चालक देसाई यांच्यासह मंडणगडहून रत्नागिरी येथे क्राईम मीटिंगसाठी निघाले होते वाटेत दुपारी दोन वाचण्याचे सुमारास खेड तालुक्यातील दस्तुरी फाट्या जवळ रस्त्यावर चार चाकी आणि दोन चाकी वाहनांचा भीषण अपघात झालेला होता.
यातील दोन चाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झालेला होता, त्याचे दोन्ही पाय बाजूला मोडलेले आढळले. चेहरा गंभीर जखमी होऊन रक्त वाहत होते. बाजूलाच थोडया अंतरावर एक स्त्री पाय तुटलेल्या अवस्थेत पडली होती घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. पण पुढे अपघातग्रस्तांचे मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. दोन्ही जखमी ना तात्काळ उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये नेणे आवश्यक होते व यासाठी रुग्णवाहीकेची ची वाट बघण्यात वेळ जाणार होता. त्यामुळे पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी आपले चालक श्री. देसाई यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पोलीस गाडीने दोन्ही जखमी ना हास्पिटल ला नेण्याचे ठरविले. घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने मोटार सायकल स्वरास पोलीस जीप मध्ये स्वतः उचलून ठेवले. आणि त्या जखमी स्त्री ला दुसऱ्या एका जीप मध्ये उचलून ठेवले. दोन्ही गाड्या सुसाट वेगात सायरन वाजवत खेड येथील डॉ. तलाठी यांच्याकडे नेले. तेथे मुख्य डॉ. उपलब्ध नसल्याने आणि जखमी वर तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्यामुळे तात्काळ रुग्णवाहीका बोलावून दोन्ही जखमी ना खेड येथील यश हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना दोन्ही जखमींवर तात्काळ उपचार चालू केले. आणि दोन्ही जखमीचे प्राण वाचले. पोलीस निरिक्षक श्री. नितीन गवारे यांनी तेथून जखमीच्या घरी कॉल करून त्यांना बोलावून घेतले.
अपघात एवढा जबरदस्त होता की, फोर व्हीलर गाडी समोरून पूर्ण आत गेली. मोटर सायकल चे सर्व भाग निघून रस्त्यावर पडले होते. पोलीस घटनास्थळी पोहचल्यामुळे आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेतल्यामुळे अपघातग्रस्त दोन जीवांचे प्राण वाचले. अपघातात जखमी जखमी आकिब कामाने आणि त्याची पत्नी आफिया कामाने कुंबळे येथील रहिवासी असून जखमींची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याची माहीती मिळत आहे.