लाठीवरील पोलिसांकडून धक्काबुक्की

कारवाईसाठी पोलीस निरीक्षकांकडे अर्ज
Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2025 16:51 PM
views 950  views

 सावंतवाडी : बांदा पोलिस लाठीवर धक्काबुक्की केल्याची तक्रार माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य संपर्क संघटक सावंतवाडी तालुका प्रमुख सुशिल चौगुले यांनी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. या कृत्यास जबाबदार सहपोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांच्यावर एफआयाआर दाखल करून या प्रकरणी खात्याअंतर्गत योग्य चौकशी व निलंबनाच्या कार्यवाहीसह प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्याकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.


श्री चौगुले यांनी या निवेदनात म्हटले आहे की, कामानिमित्त बांदा ते सावंतवाडी असा प्रवास करीत होतो. बांदा पोलीस लाठी याठिकाणी टू-व्हिलर सहित इसमाला 6 ते 7 पोलीस घेरून उभे होते व बातचीत करीत होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पदाधिकारी म्हणून कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी मी त्या ठिकाणी थांबलो. संबंधित पोलीस यांना विचारणा केली असता त्यातील सहपोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी माझ्याशी हुज्जत घालून माझा हात पिळवटून ढकलून दिले. आमचे काम चालू आहे तू मध्ये येऊ नकोस. तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आजमितीपर्यत कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणात दिलेली नाही. प्रशासनात काम करीत असताना चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठविणे माझे, काम असून ते प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यासाठीच दोन्ही आयोगाची अत्यंत महत्वाची जबाबदारीची पदे ही मला, दिली गेलेली आहेत. इन्सुली पोलीस लाठी याठिकाणी हे अशाप्रकारचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैध मार्गाने पैसे कमाविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून या लाठीवर कर्तव्य बजावणीसाठी तैनात असतात. सर्वसामान्य वाहनधारकांना तसेच सर्वसामान्य जनतेस अर्थाजनासाठी त्रास देत असतात. त्यांनी पकडलेला इसम हा दारू वाहतूक करीत होता व संबंधित पोलीसांच्या सांगण्याप्रमाणे हे पंचनामा केल्याचे भासवित होते. जर त्या ठिकाणी मी विचारणा केली नसती तर नेहमीप्रमाणे संबंधितांवर कारवाई न करता आर्थिक हात मिळवणी करून सदर इसमास सोडून दिल असतं. मात्र माझ्यामुळे हा त्यांचा खेळ फसला व त्याचा राग अनावर झाल्याने पोलीसाने अशाप्रकारचे निंदनीय कृत्य केले. त्यामुळे शासननिर्णयाप्रमाणे सदर कृत्यास जबाबदार सहपोलीस उपनिरीक्षकावर एफआयआर दाखल करून या प्रकरणी खात्याअंतर्गत योग्य चौकशीसह शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह तात्काळ निलंबनाच्या कार्यवाहीसह प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्याकडे द्यावा. अन्यथा सदर प्रकरणी आपणांस कोणतीही पूर्वकल्पना न देता शासननिर्णयाच्या अवहेलनेप्रकरणी आपली तक्रार ही वरीष्ठ पातळीवर करण्यात येईल व त्यानंतर उदभवणाऱ्या सर्व कायदेविषयक बाबींसाठी गैरकृत्य करणाऱ्या सहपोलीस उपनिरीक्षक यांच्यासह बांदा पोलीस निरीक्षक म्हणून सदर कर्मचारी यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार असाल असा इशारा त्यांनी दिला आहे.