वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये "पोलीस ग्रामसंवाद" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने मातोंड येथील विकास सोसायटीच्या श्री देव रवळनाथ सभागृहात हा ग्रामसंवाद उपक्रम वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सायबर गुन्हयांबाबत तसेच डायल 112 बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या तसेच ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी मातोंड ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या त्रासाबाबत उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या. यावर सदर विषय पोलीस अधीक्षक व वनविभाग यांना कळवण्यात येईल असे निरीक्षक भोसले यांनी सांगितले. तसेच मातोंड गावात पूर्वीपासून दारू विक्री बंदी असताना एका महिलेकडून दारू विक्री होत असल्याबाबत उपस्थित महिलांनी कारवाईची मागणी केली यावर त्या संबंधीत महिलेवर वारंवार कारवाई करण्यात आली असून याबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील असे आश्वाशीत केले.
तसेच गावात येणारे फेरीवाले, भोंदू बाबा, धार्मिकतेच्या नावावर पैसे उकळणारे आल्यास किंवा त्यांच्याबद्दल संशय आल्यास तात्काळ वेंगुर्ला पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या. तसेच यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी तंटामुक्ती समितीला येणाऱ्या विविध समस्या मांडल्या व तंटामुक्ती समितीच्या सभेवेळी एक पोलीस कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याची मागणी केली. तर देवस्थान कमिटी अध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे गावातील बारस उत्सव व घोडेमुख जत्रोत्सव याला केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल आभार मानले.
यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, माजी सरपंच उदय परब, जानवी परब, विकास सोसायटी संचालक एम. जी. मातोंडकर, व्हा. चेअरमन श्री.मोरजकर, पोलीस कॉन्स्टेबल तथा मातोंड बिट अंमलदार दीपाली मठकर, पोलीस कॉन्स्टेबल बंटी सावंत, देवस्थान कमिटी सल्लागार दादा परब-म्हालटकर, ग्रामपंचायत सदस्य सुजाता सावंत, किरण मातोंडकर, वैभवी परब, राहुल प्रभू, विशाल बागायतकर, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष तुकाराम परब, परशुराम उर्फ आबा परब, सोसायटी संचालक श्री नाईक, दीपाली परब, माजी ग्रा प सदस्य नितीन परब, होमगार्ड प्रमुख संतोष मातोंडकर, ग्रामसंघ सीआरपी रश्मी सावळ, आशा सेविका सायली राऊळ, पेंडुर पोलीस पाटील श्याम नेमण यांच्यासाहित महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मातोंड पोलीस पाटील सागर परब तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा. प. सदस्य तथा पत्रकार दिपेश परब यांनी केले.