
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री ना. योगेश कदम बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख अनिकेत तेंडुलकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके आदी उपस्थित होते.
ना.कदम म्हणाले, कालच जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील शासकीय कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड घालून कोकणातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने या आढावा बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. चांगल्या प्रकारे आढावा बैठका झाल्या. जे जे प्रश्न आहेत, ते तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरच आपण जिल्हा दौर्यावर येणार असून त्यावेळी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आ.निलेश राणे आणि आ.दीपक केसरकर प्रशासनातील अभ्यासू नेतृत्व असून, त्यांनी अनेक मुद्दे या बैठकीत मांडले. राज्यमंत्री म्हणून लोकप्रतिनिधींच्या सोबत कोकणातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. जसे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा प्रमाणेच कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहीजे, ही प्रथा कोकणात सुरू झाल्याचे दिसत आहे. राज्यमंत्री झाल्यावर या जिल्ह्यात हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात अनेक गोष्टी शिकता आल्या, वेगळाच अनुभव आला. अनेक योजना आहेत, त्या तळागाळापर्यंत पोचणे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात साकवांवर पाणी आल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटतो. यावर कायमस्वरूपीची उपाययोजना म्हणून वाडी वस्त्यांमधील सर्व साकवांचे मोठ्या पुलांमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष साकव कार्यक्रम रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास विभागाकडून विशेष पॅकेज यासाठी देण्यात येणार असून, पावसाळ्यात पाण्यामुळे संपर्क तुटून निर्माण होणारी समस्या दूर होणार आहे. तसेच लहान लघुपाटबंधारे प्रकल्प कोकणात यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार असून यासाठी कोकणासाठी विशेष निधीच्या पॅकेज साठी प्रयत्न करणार आहोत. कोकणच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्हाला चांगली साथ मिळत असून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द आम्हाला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व प्रश्न सोडविण्यात येतील. आ.दीपक केसरकर व आ.निलेश राणे याबाबत पाठपुरावा करतीलच. कोकणातील देवस्थान, आकारीपड, रिक्त पदे, वाळू धोरण, महसूल आदी प्रश्नांबाबत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कोकणातील अनेक वर्ष रखडलेला देवराई व देवरहाटीचा प्रश्न आपण सोडविला आहे. त्यामुळे आता तशी नोंद असलेल्या ठिकाणच्या वास्तू व देवळांची दुरूस्ती करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ना.कदम यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात अवैध धंद्ये प्रचंड कमी आहेत. तरीही जे चुकीचे चालले असेल त्याला पोलिसांनी वेळीच आवर घातलाच पाहिजे. पालकमंत्र्यांनी अलिकडेच केलेली कारवाई चुकीची नव्हती. आपणही पोलीस महानिरीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. एएनटी नाॅर्केटिक टास्क फोर्स बाबतची जिल्ह्यात आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असेही मंत्री ना.कदम म्हणाले.
आ.राणे म्हणाले, या जिल्हामार्गे डुप्लिकेट दारू, ड्रग आणि बीफची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून याचा कायमचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. त्यावर ना.कदम यांनी याबाबत तातडीने आयजी आणि एसपींशी चर्चा करून सुचना देण्यात येतील असे सांगितले.
माणगांव खोऱ्यात टाळंबा प्रकल्प मंजूर आहे. पण परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आधी तेथील लोकांना ते धरण हवं की नको हे विचारल्याशिवाय आपणाला पुढे जाता येणार नाही. लोकांनी सांगितल तर करू धरण. सरकारच आपलच आहे. लोकांच्या दरबारात आम्हाला जाऊ द्या. जनमताचे एकमत झाले की प्रकल्प सुरू करू, अशी भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली.