
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत हजारो रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये खालील व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कोलगाव कुंभयाळ वाडी येथे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रवींद्र लक्ष्मण राऊळ (वय ४९) याच्याकडून १०,१०० रुपये किमतीच्या सुमारे १०० बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. माजगाव ख्रिश्चनवाडी रात्री पावणे आठ वाजता लुईस अंतोन देसा (वय ६१) याच्या ताब्यातून १,९०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. कलंबिस्त ख्रिश्चनवाडी झूजे मोतेस रोड्रिक्स (वय ६७) याच्याकडून ४,१०० रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या १८ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय. सुधीर सावंत, हवालदार प्रकाश कदम, तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय. श्रीमती मुळीक, हवालदार मनोज राऊत, अमित राऊळ, दीपक शिंदे आणि धोत्रे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.
रात्री उशिरा या तिन्ही आरोपींविरुद्ध अवैध दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.











