'राधाकृष्ण चषक २०२६' सांगीतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 28, 2026 16:34 PM
views 84  views

सावंतवाडी : भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने जागतिक पटलावर आपला ठसा उमटविला आहे. आपल्या जिल्ह्यातही या शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या कोकणातील युवा साधकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची कला रसिकांसमोर आणुन त्यांच्या कलागुणांना न्याय द्यावा व त्यांना प्रोत्साहित करावं या उद्देशाने 'श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग' व 'स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव' यांच्या संयुक्त विद्यमाने "राधाकृष्ण चषक २०२६" या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह, आजगाव येथे करण्यात आले होते. या अंतर्गत 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा' व 'सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा' घेण्यात आली.

 महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-गोवा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन परीक्षक पं. मुकुंद मराठे, मळेवाड जि प सदस्या सौ. अपर्णा सातोस्कर-प्रभू, सम्राट क्लब गोवा चे अध्यक्ष नरेश पेडणेकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार सौ.वीणा दळवी, वेतोबा देवस्थानचे मानकरी अमित प्रभूआजगांवकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल)' विभागात प्रथम पारितोषिक रोख ₹ ७००१/- व 'राधाकृष्ण चषक'ची मानकरी ठरली प्रियोळ, फोंडा गोवा ची कु. निती राजेश कोरडे तर द्वितीय पारितोषिक रोख ₹ ४००१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली रत्नागिरीची कु. सार्था नरेंद्र गवाणकर. तृतीय पारितोषिक रोख ₹ ३००१/- व सन्मानचिन्हचा विजेता ठरला चिपळूण येथून आलेला अनामय सदाशिव बापट, उत्तेजनार्थ प्रथम ओंकार प्रकाश शेटगावकर तर उत्तेजनार्थ द्वितीय चे सदानंद गोकुळदास झो हे मानकरी ठरले.संगीतभूषण पं. राम मराठे यांचे सुपुत्र आणि ठाणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक पं. मुकुंद मराठे यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी स्पर्धक व संगीत साधकांना शास्त्रीय संगीताविषयी सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं. पारितोषिक वितरण सोहळा देवस्थानचे मानकरी दादा प्रभू आजगावकर, आजगाव येथील निवृत्त शिक्षक वसंत आपटे, परिक्षक महोदय आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला..

या सांगितिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी-गोवा मर्यादित "सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा" छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. परिक्षक मुकुंद मराठे, संगीत अलंकार सौ. वीणा दळवी, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर, भाई शेवडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ३००१/- व 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली खारेपाटणची कु. प्राजक्ता अभय ठाकूर-देसाई तर द्वितीय पारितोषिक रोख ₹ २००१/- व सन्मानचिन्ह/- चा विजेता ठरला डेगवे सावंतवाडीचा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर. तृतीय पारितोषिक ₹१००१ व सन्मान चिन्ह ची विजेती ठरली घावनळे कुडाळ ची कु. तनुश्री निलेश मराठे, श्लोक निलेश सामंत, नमिता वामन शेणई, गौरी राजन वस्त, मुग्धा महेश पंतवालावलकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सवेष साभिनय नाट्यगीत' मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५०१/- व 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली. रत्नागिरीची कु. सार्था नरेंद्र गव्हाणकर, द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३५०१ व सन्मानचिन्ह विजेता ठरला रत्नागिरीचाच आदित्य आनंद लिमये. तर तृतीय पारितोषिक रोख ₹२५०१/- व सन्मानचिन्हचा विजेता बांदोडा गोवा येथील सौमित्र सिद्धार्थ नाईक. उत्तेजनार्थ प्रथम आजगाव सावंतवाडीची दीक्षा प्रदीप काकतकर, उत्तेजनार्थ द्वितीय माजगाव सावंतवाडीची नेहा प्रभाकर दळवी, उत्तेजनार्थ तृतीय तुळस वेंगुर्लेची जागृती दिनेश  तुळसकर, तर उत्तेजनार्थ चतुर्थ तळवडे सावंतवाडीचा हेमंत हनुमंत गोडकर यांना देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षणही पं. मुकुंदजी मराठे यांनीच केले. यावेळी त्यांनी स्पर्धकांना संगीत रंगभूमी व मराठी नाट्यसंगीताविषयी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा सन्माननीय परिक्षक पं.मुकुंदजी मराठे, भजनसम्राट श्री भालचंद्र केळुसकर बुवा, देवस्थानचे प्रमुख मानकरी दादा प्रभू आजगावकर, सौ. वीणा दळवी, हेमंत दळवी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम साहिल घुबे, ऑर्गन भालचंद्र केळुसकर बुवा तर तबला साथ प्रसाद मेस्त्री, गोवा येथील आदित्य तारी यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केलं. अनेक संगीत साधकांनी व संगीतप्रेमी रसिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व "राधाकृष्ण चषक २०२६" हा सांगीतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, पारितोषिकांचे सर्व प्रायोजक, कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व सहभागी स्पर्धक, उपस्थित सर्व संगीतप्रेमी, स्पर्धेचे मान्यवर परीक्षक, श्री वेतोबा देवस्थानचे सर्व मानकरी, दोन्ही मंडळांचे सर्व सदस्य, श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग या सर्वांचे 'श्री राधाकृष्ण संगीत साधना'चे सचिव हेमंत दळवी यांनी आभार मानले.