तापमानातील वाढीमुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवा

दुरुस्ती कामाच्या भागातीलच वीज पुरवठा बंद ठेवा ; जावेद खतीब यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2026 15:15 PM
views 33  views

सावंतवाडी : दुरुस्ती व साफसफाईची कामे सुरू असल्याची बतावणी करून इन्सुली उपकेंद्रातर्गत संपूर्ण गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून वृद्ध, रुग्ण, नवजात बालक, गर्भवती महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने ज्या भागात दुरुस्तीची कामे सुरू असतील त्याच भागातील वीजपुरवठा बंद ठेवून अन्यत्र ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा इशारा बांदा माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब यांनी महावितरणला दिला आहे.


 इन्सुली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील वीजपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येतो. दुरुस्ती व साफसफाईच्या कामाच्या नावाखाली सर्वच गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. वृद्ध, नवजात बालक, रुग्ण, गर्भवती महिला यांच्यासह सर्वच नागरिकांना उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मंगळवार संपूर्ण दिवस पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


महावितरणची ज्या भागात किंवा परिसरात दुरुस्ती अथवा साफसफाईची कामे सुरू असतील त्या भागातील वीजपुरवठा खंडित करून अन्यत्र पावसाळ्यापर्यंत तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी जावेद खतीब यांनी महावितरण कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. तसेच ज्या गावात दुरुस्तीची कामे करावयाची असतील त्या गावातील सरपंच यांना त्याची कल्पना देऊन वीज पुरवठा खंडीत करावा. याची पूर्तता न झाल्यास प्रसंगी महावितरणवर धडक देऊन जाब विचारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.