श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुक्रवारी

Edited by: लवू परब
Published on: April 28, 2026 15:03 PM
views 72  views

दोडामार्ग : पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ, मुंबई आणि धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सव सांगता समारोह शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याची माहिती दोडामार्ग येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव प्रमोद गवस, अनंत धुरी, सुनील गवस, अशोक गवस, सुभाष गवस, विद्याधर धुरी आदी उपस्थित होते. त्यांनी सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे हे १९७३ साली नोंदणीकृत झाले असून गेल्या वर्षी दोन दिवसीय सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्याचाच सांगता सोहळा यंदा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. विद्यालयाच्या पटांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या स्वागताने होणार असून १०.४५ वाजता दीपप्रज्वलन व उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर नूतनीकरण केलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन, प्रस्तावना आणि विशेष मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटक म्हणून नवीन मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप उत्तम गवस, तर अध्यक्षस्थानी माझी प्रशासकीय अधिकारी तथा सिडकोचे सल्लागार मोहन गुणाजी गवस राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्गचे विजय काळे, भाजपचे युवा नेते  विशाल परब, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, संपादक संदीप देसाई, दि बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, समन्वय समिती सचिव  रश्मीताई तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, मराठी साहित्यिक सतीश धर्णे, पिके सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गवस बंधू भगिनींचा विशेष सत्कार

या सोहळ्यात गवस बंधू-भगिनींचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांनी तालुका, जिल्हा परिषद तसेच मुंबई महानगरपालिकेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप उत्तम गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या स्नेहा गवस आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. तदनंतर मान्यवरांची मनोगते आणि आभार प्रदर्शनानंतर, महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध सिनेकलाकार किशोर सावंत यांची मिमिक्री व जादूचे प्रयोग, ६.३० वाजता विजयानंद नाईक यांचे शास्त्रीय गायन आणि रात्री ८ वाजता ‘देवी विशालाक्षी महिमा’ या पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाने कार्यक्रमाची सांगता रंगणार आहे.

शैक्षणिक परंपरेचा गौरव, सामाजिक एकात्मतेचा संदेश आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम असलेला हा सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.