
वेंगुर्ला : देवाच्या उत्सव मूर्तीला पालखीत कोणी ठेवायचे व पालखी कोणी फिरवायची यावरून गावात मानकऱ्यात वाद. कितीही प्रयत्न केले वाद मिटेना. मग काय तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी निर्णय घेत हा धार्मिक कार्यक्रम स्वतःच पार पडायचे ठरवले. व स्वतः वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी देवाची मूर्ती स्वतःच पालखीत ठेवत ते पालखीचे भोई झाले. व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडला. ही घटना आहे वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड येथील गिरोबा मंदिरातील.
मोचेमाड येथील गिरोबा मंदिरात दसरा उत्सव, महाशिवरात्री, रामनवमी, जत्रोत्सव असे असेक उत्सव संपन्न होतात. यावेळी देवाची पालखी मिरवणूक केली जाते. दरम्यान गेल्या वर्षीपासून या पालखीत देवाची मूर्ती कोणत्या मानकऱ्यांनी ठेवायची व पालखी कोणी फिरवायची यात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र काही केल्या वाद मिटला नाही. अखेर शांततेत धार्मिक उत्सव पार पाडण्याच्या उद्देशाने प्रशासनानेच ज्या गोष्टीवरून वाद आहे ते काम स्वतः करण्याचे ठरवले. यानुसार दसरा उत्सव, महाशिवरात्री व आता रामनवमी च्या उत्सवाला स्वतः पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी पालखीत देवाची मूर्ती ठेवत पालखीला खांदा दिला. आज पोलीस बंदोबस्तात हा रामनवमी उत्सव शांततेत संपन्न झाला.