
वैभववाडी : दोडामार्ग येथील वेदांत कंपनीचा दगडी कोळसा चोरी करून नेणारे दोन ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडले. रविवारी मध्यरात्री 2 वा. करुळ चेकपोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोन ट्रकसह पोलीसांनी १८ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी आज रात्री उशिरा ट्रान्सपोर्ट कंपनी आणि दोन ट्रकचालकांवर गुन्हा दाखल केला.
करूळ तपासणी नाक्यावर रविवारी रात्री ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलीसांकडुन तपासणी सुरू होती. या दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारे (केए-२५ डी-९९१५ आणि केए-२२,सी-९४०२) हे दोन ट्रक करूळ तपासणी नाक्यावर आले. नाक्यावर असलेले पोलीस हवालदार नितीन खाडे आणि पोलीस हवालदार राहुल पवार या पोलीसांनी तपासणीसाठी हे दोनही ट्रक थांबविले. चालकाकडे विचारणा केली असता दगडी कोळसा असल्याचे सांगत कोल्हापुरला घेवुन जात असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी पोलीसांनी चालकांकडील कागदपत्राची तपासणी केली असता दोनही ट्रक चालकांकडे वाहतुक परवाना मिळुन आला नाही. त्यामुळे पोलीसांचा संशय वाढला. त्यांनी यासंदर्भातील माहीती वैभववाडी पोलीस स्थानकात दिल्यानंतर दोनही ट्रक पोलीसांनी ताब्यात घेवुन ते वैभववाडीत आणले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन ट्रकमध्ये सुमारे २२ टन दगडी कोळसा आहे. यासंदर्भात पोलीसांनी आज सकाळपासुन चौकशी सुरू केली. त्यानंतर दुपारी दोडामार्ग येथील वेदांत कंपनीचे अधिकारी वैभववाडीत पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तद्नंतर पोलीसांनी कंपनीच्या तक्रारीनुसार मालवाहतुक करणारी ट्रान्सपोर्ट कंपनी साई बालाजी आणि दोनही ट्रकचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीसांनी पकडलेल्या दगडी कोळश्याची किंमत सुमारे ८ लाख ५८ हजार इतकी आहे. ट्रकसह १८ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेदांता ही कंपनी दोडामार्ग येथे या कोळशाचे उत्खनन करते. तेथील कच्चा माल झाराप येथून रेल्वेने झारखंड, मध्यप्रदेश या राज्यासह अन्य ठिकाणी पाठवते. दरम्यान वाहतुकीवेळी खराब झालेला माल कंपनी पुन्हा माघारी नेते. मात्र रविवारी हा माल हे ट्रक चालक झाराप येथून परस्पर घेऊन अन्य ठिकाणी नेत होते. मात्र करुळ तपासणी नाक्यावर त्यांची चोरी पकडली गेली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.