
कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी रूट मार्च काढला. गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.
हा रूट मार्च कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला. यामध्ये शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला होता. कणकवली पटवर्धन चौक येथून सुरू झालेला हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे कणकवली पोलीस स्टेशन येथे संपला. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या रूट मार्चमध्ये कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश सावंत, श्री पडळकर, उपनिरीक्षक श्री. पन्हाळे यांच्यासह 30 पोलीस कर्मचारी, 30 सीआरपीएफ आणि 20 होमगार्ड उपस्थित होते.