
सावर्डे : मानवी जीवन अमूल्य आहे. शालेय वयात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. कोणतीही आधुनिक यंत्रे वापरताना सावधानता पाळा. अठरा वर्षानंतरच वाहने चालवा. योग्य परवाना घ्या. बेफिकीरपणा करू नका कारण आपल्या आई वडिलांनी आपल्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहिलेले असतात त्या दृष्टीने आत्तापासूनच प्रयत्नशील राहा.नेहमी नियम पाळा म्हणजे अपघात टाळता येतील असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे यांनी याप्रसंगी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे, भूषण सावंत, पोलीस हवालदार संतोष कदम होमगार्ड कदम व पोहवा, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक भूषण सावंत व संतोष कदम यांनी विद्यार्थ्यांना 762 एसेला व 9 एम एम कार्बन मशीन या बंदुकींची सविस्तर माहिती देताना त्यांचे टार्गेट, वजन, मशीन चालवताना घ्यायची काळजी,हाताळण्यासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण विविध माहिती देऊन या बंदुकीच्या विविध भागांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय उत्साहाने या बंदुकीची हाताळणी करून माहिती घेतली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बंदुकीची हाताळणी करण्याचा आनंद याप्रसंगी लुटता आला. या कार्यक्रमाचे निवेदन अशिक शितोळे यांनी केले.