गोवा दारूची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

दुचाकीसह ३८ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त | एकाला अटक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 29, 2022 12:09 PM
views 258  views

वैभववाडी : दुचाकीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील एकावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नेमिनाथ बाबासो सुतार (रा. मालीमुशिंगी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) असं दुचाकीस्वाराच नाव आहे. त्याच्याकडून दुचाकीसह ३८ हजार ६२०रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आज बुधवारी करूळ चेक नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. 

संशयित सुतार हा आपल्या दुचाकीवरून ( क्रमांक एम एच ०९ए एक्स ४१४१ ) वैभववाडी ते कोल्हापूर असा प्रवास करत होता. त्याच्याच दुचाकीवर मागील बाजूस पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या भरलेला बॉक्स बांधण्यात आला होता. पोलिसांना दुचाकीस्वाराचा संशय आल्याने त्यांनी गाडी उभी करून तपासणी केली. यावेळी या बॉक्समध्ये दोन लिटर मापाच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या दोन बाटल्या, दोन लिटर मापाच्या ब्लेंडर्स प्राईड कंपनीच्या दोन बाटल्या व ७५० मिली मापाच्या ब्लेंडर्स प्राईड कंपनीच्या सहा बाटल्या, असा ९६२० रुपयाच्या दारूने भरलेल्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या दारूने भरलेल्या बाटल्यासह ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ३९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नितीन खाडे करीत आहेत.