कवी सफरअली इसफ यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

Edited by:
Published on: March 11, 2025 13:44 PM
views 251  views

कणकवली :  राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य पुरस्कार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहासाठी जाहीर करण्यात आला आहे. 11 हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च रोजी पुणे टिळक स्मारक मंदिर येथे दिग्दर्शक नागनाथ मंजुळे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते सदर पुरस्काराने सफरअली यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती पुरस्काराचे संयोजक माजी आमदार, कवी रामदास फुटाणे यांनी दिली.

पुणे येथील प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रामदास फुटाणे यांच्या संयोजनाखाली १२ मार्च या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनी दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट साहित्य कृतीला यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याचबरोबर कला क्षेत्रातील एका मान्यवरालाही यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी साहित्य विभागात कवी सफरअली इसक यांच्या अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाची यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारासाठी तर कला विभागातील पुरस्कारासाठी अभिनेते अशोक सराफ यांची निवड करण्यात आली.

कवी सफरअली इसफ यांचा अल्लाह ईश्वर हा काव्यसंग्रह सध्या बहुचर्चित असून यापूर्वी त्याला समाज साहित्य प्रतिष्ठानचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार, इचलकरंजी येथील संस्कृती काव्य पुरस्कार, प्रभा प्रकाशनाचा प्रभा प्रेरणा पुरस्कार, मास्तरांची सावली काव्य पुरस्कार, सम्यक संबोधी काव्य पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यानंतर आता प्रतिष्ठित अशा यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी अल्लाह ईश्वर या संग्रहाची निवड करण्यात आली आहे.

अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांची प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात, अल्लाह ईश्वर मधील कविता आजच्या धार्मिक उन्मादा विरोधात आवाज आहे. कवीला अनेक प्रसंगातून जावं लागलं आणि धर्माच्या आडून त्रास देणाऱ्यानाही सहन करावे लागले तरीही कवीने कवितेत कुणाबद्दल अपशब्द व्यक्त केला नाही. अशी मानव्याची आस लागलेली ही कविता मराठी कवितेत दुर्मिळ अशी आहे. भेदाच्या भिंती उभ्या केल्या जात असताना त्या जोडण्याची इच्छा ही कविता बाळगते. माणसाने माणूस म्हणून जगायला पाहिजे त्याची धर्मात,जातीत विभागणी होता नाही असे आवाहनही ही कविता करते. या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार या कवितेला लाभला हा या कवितेचा यशोचित गौरवच आहे.