कवी 'युवराज सावंत यांच्या"घुसमट"चे शानदार प्रकाशन'

Edited by: संदीप देसाई
Published on: June 22, 2023 19:23 PM
views 123  views

दोडामार्ग : माध्यमिक विद्यालय मांगेली ता.दोडामार्ग येथे अध्यापनाचे कार्य करणारे साहित्यिक कवी युवराज सावंत यांच्या बहुप्रतिक्षीत 'घुसमट'कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे साहित्य रसिक वाचकांच्या मोठ्या उपस्थितीत सपन्न झाले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव गुरव, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर,कवी युवराज सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.     

यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.टी.के.सरगर, विजया कांबळे,प्रा.छाया पाटील, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, सिने कलाकार सागर सातपुते, राजीव जाधव,अमर पारखे,चंद्रकांत फडतरे,Adv.करूणा विमल,प्रकाशक अनिल म्हमाने, प्रा.डॉ. शोभा चाळके हे मान्यवर उपस्थित होते.

   कवी युवराज सावंत यांच्या पहिल्या बहुचर्चित 'स्वातंत्र्यात आंम्ही कुठे?'या कविता संग्रहानंतर'घुसमट'हा सामाजिक भानाच्या जाणीवेतून तयार झालेला दुसरा कविता संग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. प्रकाशना नंतर हाही कविता संग्रह चर्चेत राहील, कारण सभोवतालच्या वास्तवावर,सामान्य माणसाच्या जगण्यामरणाच्या प्रश्नावर,राज्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारावर, पदोपदी होणाऱ्या आम जनतेच्या घुसमटीवर... हळूवारपणे,संयतपणे,संवेदनशीलतेने पण तितकेच रोखठोक प्रश्नांकित परखड भाष्य कवी युवराज सावंत यांनी केल्याचे अभिप्राय वजा मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संग्रहातील प्रत्येक कविता ही प्रत्येक सजग मनाच्या माणसाला विचार करायला भाग पाडेल इतकी दमदार आणि विषय आशयपूर्ण आहे. सामान्यांच्या प्रश्नांचा संदेश घेऊन आलेली ही कविता समाजातील विचारवंत,राजकीय भाष्यकार, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य माणूस या सर्वांना विचलित करेल.आजचा भयानक भोवताल,गंभीर होत चाललेली परिस्थिती अशावेळी सामाजिक भावनेच्या जाणीवेतून समाजहिताच्या दृष्टीने लेखक कवी साहित्यिकांची मोठी जबाबदारी वाढलेली आहे, याच भावनेतून कवी युवराज सावंत यांनी सद्य परस्थितीवर,वास्तवावर निर्भिड नेमकेपणे भाष्य केले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे तितकेच आवश्यक आहे.

    घुसमट मधील कविता या नुसत्याच वाचनीय नाहीत तर चिंतनीय आहेत. प्रत्येकाच्या घुसमटीची उकल कवीने मोठ्या खुबीने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संग्रहाचे प्रामाणिक स्वागत आहे. प्रत्येकाने आपापली घुसमट शोधावी हा कविचा आशावाद निद्रिस्त समाजाला जागवेल असा विश्वास शेवटी मान्यवरांनी व्यक्त केला.    शेवटी निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने यांनी सर्वांचे आभार मानले.