कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी कवी दीपक पटेकर

जिल्हा प्रतिनिधीपदी ॲड. संतोष सावंत यांची निवड
Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2025 16:00 PM
views 129  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी निवडणूक निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून ॲड. संतोष सावंत यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. 


सावंतवाडी येथे आज रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५ ते २०२८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांची  कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी तर राजू तावडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्षपदी डॉ. दीपक तुपकर तर सहसचिवपदी विनायक गांवस यांची निवड जाहीर करण्यात आली. ॲड नकुल पार्सेकर, भरत गावडे, प्रज्ञा मातोंडकर,मंगल नाईक-जोशी,मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदन केले. तसेच मनोगतात नूतन कार्यकारिणीनं साहित्य चळवळ जोमानं पुढे नेण्याचे आवाहन केले. सर्वांनी दिलेल्या जबाबदारीनं पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिप्रेत कार्य करावं असं आवाहन केलं. गेली तीन वर्षे ॲड संतोष सावंत व कार्यकारिणीने उत्तमरित्या काम पाहिलं होतं. जिल्हा साहित्य संमेलनासह विविध साहित्यिक कार्यक्रम या तीन वर्षांत राबविले गेले. यासाठी मावळत्या कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी मांडला. 

सभेच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद,  ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर तसेच कोमसाप परिवारातील सदस्यांचे निधन झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिभा चव्हाण यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. डॉ. दीपक तुपकर यांनी नफा-तोटा अंदाजपत्रक सादर करत वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. ॲड.सावंत यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. यानंतर नुतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, केंद्रीय सदस्या सौ. उषा परब, तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब, प्रा.सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, विनायक गांवस यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 

नवनियुक्त जिल्हा प्रतिनिधी ॲड.सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना मावळत्या कार्यकारणीचे अभिनंदन करून नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात तालुक्याच प्रतिनीधीत्व करताना पदाला न्याय देईन असं मत व्यक्त केलं.

नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर म्हणाले, सर्वांनी  आपल्यावर विश्वास टाकून संधी दिली याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. साहित्यिकांची भूमी असलेल्या या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल यावर माझा भर असेल. त्यासह नवं साहित्यिकांना व्यासपीठ देण्यावर आपला भर राहणार आहे. कोमसापचं सुरू असलेलं कार्य अधिक जोमानं पुढे घेऊन जाण्यासह मधु भाईंना अपेक्षित कार्य शाखेच्या माध्यमातून होईल असा विश्वास  व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए. बुवा, एस.एन. मुकन्नावर, प्रा. गणपत शिरोडकर, अभय नेवगी, दिनानाथ नाईक, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, दत्ताराम सडेकर, वाय. पी. नाईक, मृणालिनी कशाळीकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, सुहासिनी सडेकर, मंगल नाईक जोशी, डॉ. सोनल लेले, किशोर वालावलकर, संजीव मोहीते, प्रा.डॉ.गणेश मर्गज, एकनाथ कांबळे, रामदास पारकर, संतोष पवार, रितेश राऊळ आदी उपस्थित होते. आभार प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी मानले.