सावंतवाडीत संविधान जागरनिमित्ताने रंगल्या 'आंबेडकर चौकातील कविता '

जिल्ह्यातील साहित्यिकांनी आणली काव्यसंमेलनात रंगत
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 28, 2022 09:33 AM
views 160  views

सावंतवाडी : येथील समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या वतीने संयोजित केलेल्या संविधान जागर कार्यक्रमांतर्गत 'आंबेडकर चौकातील कविता'  हे बहारदार काव्य संमेलन रविवारी सायंकाळी सावंतवाडीत चांगलेच रंगले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील चौकात निमंत्रण कवींनी आपल्या बहारदार काव्यरचना सादर करत संविधानाचा सकारात्मक जागर केला. यावेळी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष डी. के. पडेलकर यांनी संवर्धन समितीची भूमिका विशद केली. आपला लढा हा मानव मुक्तीचा असून समाजातील विषमतेविरुद्ध प्रखर आवाज उठवून समाजातील नीती मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला कार्यप्रवण करणे हेच असल्याचे पडेलकर यांनी सांगितले.

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ प्रा. सुभाष गोवेकर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, प्राध्यापक कौलापुरे, संवर्धन समितीच्या उपाध्यक्ष भावना कदम, सचिव मोहन जाधव, सहसचिव चंद्रशेखर जाधव,  भरत गावडे, समाज साहित्य मंडळाचे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, ममता जाधव आदी उपस्थित होते.


यावेळी प्रा. प्रवीण बादेकर म्हणाले की, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या कविता ह्या व्याकरणदृष्ट्या सदोष नसल्या तरी व्यावहारिक दृष्ट्या मात्र त्या अत्यंत वास्तववादी आहेत. 'मला काहीतरी सांगायचे आहे' या भावनेने लेखक आता जागृत होतो आणि आपले मत तो साहित्यात मांडू शकतो. आजच्या समाजातील बदल आणि वास्तव्य हे ज्याला समजलं तो चांगली कविता करू शकतो. संविधान जागर करण्यासाठी अशा काव्य संमेलनाची नितांत गरज असल्याचे प्रा. बांदेकर म्हणाले.


प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी  संविधानाच्या माध्यमातून आपण सर्व नीतीमूल्ये अंगीकारून ती अधिक दृढपणे जोपासण्याचा संकल्प केला.

 त्यानंतर 'आंबेडकर चौकातील कविता' हे बहारदार कवी संमेलन पार पडले. यात ज्येष्ठ कवी प्रकाश तेंडोलकर, प्रा. श्वेतल परब, कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे, मनोहर परब, ऋतुजा सावंत-भोसले, मिलिंद नेमळेकर, अनंत कदम, नाईक, विजया कदम, ममता जाधव, क्रांतीसम्राट शांताराम असनकर, श्रद्धा असनकर आदी कवींनी आपल्या बहारदार काव्य रचनांची प्रस्तुती करत काव्य संमेलनात रंग भरले.

 ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. शेवटी अनंत कदम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता प्रेरणा भूमी संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.