आडाळी औद्योगिक वसाहतिमधील भूखंड लवकरच खुले होतील : राजन तेली

Edited by: संदीप देसाई
Published on: July 28, 2022 17:08 PM
views 288  views

दोडामार्ग :

आडाळी औद्योगिक वसाहतिमधील भूखंड लवकरच खुले होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

आडाळी एमआयडीसीतील भूखंड 15 ऑगस्ट पूर्वी उद्योजकाना देण्यास सुरवात करावी, अशी मागणी आडाळी औद्योगिक विकास कृती समिती व ' घुंगुरकाठी ' अंतर्गत स्थानिय लोकांधिकार समितीच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे केली होती. यासंबंधीचे निवेदन एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भाजपा नेते आशिष शेलार, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिले होते.

श्री. तेली म्हणाले ' आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्याची कार्यवाही रखडली होती. स्थानिक ग्रामस्थांनी त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र मागील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. याठिकाणी उद्योजक येण्यासाठी इच्छुक आहेत. आता आपण स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोललो. येथील भूखंड तातडीने खुले करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील भूखंड लवकरच खुले होतील. तसेच येथे उद्योग येण्यासाठी प्रयत्न केले जातील.