LIVE UPDATES

जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्तीची शपथ

अधिकारी , कर्मचारी सरसावले ; अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 15:48 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार, 'नशा मुक्त भारत अभियाना'च्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहात 'National Pledge Against Drug Abuse' (अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय प्रतिज्ञा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली तसेच यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शासनाच्या http://nashamukt.dosje.gov.in/ पोर्टलवर ई-शपथ घेण्याबाबत तसेच नशामुक्त मित्र म्हणून नोंदणी करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी वराळे म्हणाल्या की, जागतिक स्तरावर अमली पदार्थांचा वाढता वापर देशातही पोहोचला असून युवा पिढीला या नशेने विळखा घातला आहे. भावी पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. महाविद्यालयीन तसेच शालेय स्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन याबाबत जनजागृती करावी. सुदृढ पिढी घडविण्यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार चैताली सावंत, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समतादूत संग्राम कासले यांनी केले.