सुदैवी ठसाळे ठरल्या प्लास्टिक मुक्त चिपळूण ‘होम मिनिस्टर'

Edited by: मनोज पवार
Published on: August 26, 2025 15:11 PM
views 35  views

चिपळूण : १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिपळूण नगर परिषदेच्या वतीने सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने आयोजित प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा २०२५ या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा व ‘होम मिनिस्टर’चा खेळ सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मोठ्या उत्साहात रंगला. अभिनेते ओंकार भोजने व आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या खेळात लकी ड्रॉमधून वसुंधरा पाटील यांना मानाची पैठणी मिळाली, तर सर्वाधिक ३८.५ किलो प्लास्टिक जमा करून १५४ कूपन मिळवणाऱ्या स्वप्नाली सुनील निवाते या दुसऱ्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. अटीतटीच्या होम मिनिस्टर खेळातून सुदैवी ठसाळे या सोन्याच्या नथच्या मानकरी ठरल्या.


प्लास्टिक मुक्तीसाठी महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. प्रत्येक १ किलो प्लास्टिकमागे महिलांना ४ कूपन्स देण्यात आले. शहरातील तब्बल ३०० हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व एकूण १७४१ किलो प्लास्टिक जमा झाले. यामध्ये १५ पेक्षा जास्त कूपन्स मिळवणाऱ्या १९२ महिलांमध्ये ‘प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर’ हा खेळ घेण्यात आला.


रत्नागिरी येथील लोककलावंत सुनील बेंडखळे यांनी या खेळात रंगत आणली. लकी ड्रॉमधून जयंत साडी सेंटरने प्रायोजित केलेली मानाची पैठणी वसुंधरा पाटील यांना मिळाली. १०० पेक्षा जास्त कूपन्स मिळवणाऱ्या महिलांना जिव्हाळा मार्ट, काविळतळी यांच्याकडून प्लास्टिकपासून अप सायकल बनवलेल्या आकर्षक शॉपिंग बॅग देण्यात आल्या. आसिफ तुरुक, जयश्री आंबेकर, कविता मिर्लेकर, तेजस्विनी किंजलकर, रूपाली आवले व साक्षी लोटेकर या महिलांनी १०० पेक्षा जास्त कूपन्स मिळवले.


एकूण १०९ महिलांना १५ कूपन्स मिळवता आले नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढण्यात आला. यातून सानिका पडवेकर, अश्विनी भुस्कुटे व फैमीदा शेख या भाग्यवान महिला ठरल्या. त्यांना नगर परिषदेच्या वतीने अपसायकल पद्धतीने बनवलेल्या शॉपिंग बॅग भेट देण्यात आल्या.

स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना जिव्हाळा मार्ट काविळतळी यांच्याकडून खरेदीवर ५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.


या सोहळ्याला आमदार शेखर निकम, अभिनेते ओंकार भोजने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी सभापती पूजा निकम, सुमित लोंढे, अदिती देशपांडे, प्राजक्ता टकले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविक भाऊ काटदरे यांनी केले. त्यांनी स्पर्धा राबवण्यामागचा हेतू, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व जमा झालेले प्लास्टिक कशा प्रकारे रिसायकल केले जाणार आहे याची माहिती दिली. मार्च २०२६पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


आमदार शेखर निकम यांनी नगर परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना, “आपल्या घरात प्लास्टिक जमा होणार नाही, अशी जीवनशैली अंगिकारू या” असे आवाहन केले.

मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, “नागरिकांचा आणि नगर परिषदेतील सहकाऱ्यांचा मोलाचा सहभाग असल्यामुळेच स्वच्छता अभियानात चिपळूण शहराने राज्यात १४ वा व कोकणात प्रथम क्रमांक मिळवला.”


मुख्याधिकारी विशाल भोसले यांना नुकताच महाराष्ट्र फर्स्ट २०२५ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी चिपळूण यांच्यातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात नाटक कंपनी चिपळूणने चित्रांगण मुंबईच्या सहकार्याने तयार केलेली “राखणदार” ही प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण जनजागृती करणारी शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आली. यावेळी ओंकार भोजने यांनी वृक्षतोड व प्लास्टिकच्या अति वापरामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर प्रकाश टाकला.


सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेतील संजय तांबट, संदेश जाधव, दिनेश धुमक, विनोद थिटे, कविता पाटील, रुचिता मोहिते, साक्षी बेंडकर, मैथिली कदम, रोहिणी पांचाळ, अपर्णा कदम या प्लास्टिक संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव मुख्याधिकारी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.


जिव्हाळा मार्टचे संचालक संतोष पेढांबकर व जयंत साडी सेंटरचे जैन यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोन्याची नथ ही जयंत साडी सेंटरने प्रायोजित केली होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले तर आभार आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी मानले.