
सावंतवाडी : नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व ही तिन्ही मूल्ये ज्या व्यक्तीत असतात, तोच खरा समाजाभिमुख नेता ठरतो. दिनेश गावडे हे त्याचे सजीव उदाहरण असून गेली दहा वर्षे ते आंबोली,चौकुळ गावातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देत आहेत, असे प्रतिपादन सकल हिंदू समाजाचे व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले. विलवडे येथील राजा छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात ते बोलत होते.
दिनेश गावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविले होते. यामध्ये आरोग्य, शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू महिलांना मदत अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. तसेच चौकुळ, आंबोली, केसरी, दाणोली, सातोळी, बावळट, विलवडे, भालावल आदी गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावर्षी विशेष उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना स्टील थर्मस बॉटल वितरित करण्यात आल्या. प्लास्टिक बॉटलमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गरम व थंड पाणी ठेवण्यास उपयुक्त अशा या बॉटल्स विद्यार्थ्यांना वितरित करून "प्लास्टिक मुक्त अभियान" राबवले गेले. यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली.
कार्यक्रमादरम्यान बोलताना श्री. गावडे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टांचे स्मरण ठेवून सकारात्मक ऊर्जा बाळगावी. मी करणारच आणि मी होणारच, या आत्मविश्वासातून यश जन्माला येते.” माजी मुख्याध्यापक भरत गावडे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्याचे महत्त्व सांगताना "वाचन, चिंतन आणि गुरुजनांचे ऐकणे" या तीन गोष्टींवर भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश गावडे यांनी आपल्या शालेय जीवनातील गमतीजमती मुलांपुढे मांडल्या. त्यांच्या आठवणींमुळे हास्याचे पाझर फुटले व वातावरण हलकेफुलके झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास दिनेश गावडे यांचे मित्रमंडळ देखील उपस्थित होते.