माऊली विद्या मंदिर डोंगरपालच्या प्रशालेत वृक्षारोपण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 23, 2024 06:35 AM
views 145  views

सावंतवाडी : डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, रायगड यांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन यासाठी पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माऊली विद्या मंदिर डोंगरपाल, डिगणे यांच्या माध्यमिक प्रशालेच्या परिसरामध्ये तीनशे वृक्षांचे वृक्षारोपण ९० श्रीसदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

डोंगरपाल वृक्षारोपण प्रसंगी डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवंदडा यांचे समाजसेवेचे व्रत अलौकिक असून वृक्षारोपण व त्यांचे  संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. दरम्यान, या उपक्रमाच्या वेळी गृप ग्रामपंचायत डिंगणे चे सरपंच संजय अर्जुन डिंगणेकर,शालेय संस्था खजिनदार-गुणाजी गोपाल गवस,शाळा मुख्याध्यापक -संतोष सीताराम वावळिये, शिक्षकेत्तर कर्मचारी बाला तानू  गवस,घनश्याम  भिसे गवस,उत्तम महादेव कदम, विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ व श्री बैठक बांदा,श्री बैठक तळवडे, श्री बैठक माणगाव येथील श्री सदस्य उपस्थित होते.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे  या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत आलेले असुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे.

वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम,ऋतुचकावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही;काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नदयांना अचानक महापुर तसेच औष्णिकस्तर वाढू लागल्याने वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे.यामुळे स्वयंस्फुर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातुन होत असुन समाजासमोर आदर्श उभा राहत आहे.वृक्षारोपण करून विश्वसेवा,राष्ट्रसेवा,मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातुन आंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्वाची आहे.वृक्षलागवडी बरोबरच त्यांचे संगोपन महत्वपुर्ण आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन जिल्ह्यात यापुर्वीच्या हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपुर्वक केले जात असुन या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होत आहे. मोहगनी, जांभूळ,कांचन,अर्जुन,बेल, हरडा, आपटा,बहावा आदी विविधप्रकारची लागवड केलेल्या औषधी व जंगली झाडांचे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन संगोपन केले जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत जिल्हाभर विविध ठिकाणी आपापल्या परिसरात श्रीसदस्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले.अलीकडेच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांदा स्मशानभूमीमध्ये पाच वर्षांपूर्वी अडीचशे झाडांची लागवड करून व त्यांचे पाच वर्ष नियोजनपुर्वक संगोपन करून प्रतिष्ठान ने ती झाडे बांदा ग्रामपंचायत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. प्रतिष्ठानच्या अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.