
सावंतवाडी : मळगांवस्थीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर मंजूर झालेले रेल्वे टर्मिनस गेले ९ वर्षे सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. तर या टर्मिनस साठी महत्त्वपूर्ण असलेली व शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी सुचविलेली पाणी पुरवठा योजनाही गेल्या सहा महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी फक्त ८ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केल्यास टर्मिनससह लगतच्या तीन गावांनाही पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात या योजनेला मंजुरी मिळावी अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी ते वेंगुर्ले या नळपाणी पुरवठा योजनेवर दांडेली ते मळगाव कोकण रेल्वेसह तीन गावांना पुरक नळपाणी योजनेचा आठ कोटी ५० लाख रुपयांचा आराखडा तयार करून मंजूरीसाठी जीवन प्राधिकरणाने पाठविला आहे. मात्र, सहा महिने उलटले तरीही या आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या निर्देशानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. दोडामार्ग - मणेरी ते वेंगुर्ले या मार्गावर तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी नदीपात्रात पाणी अडवून साठवणूक करण्यात येणार आहे. या योजनेचे पाणी डेगवे येथे साठवणूक करुन ते वेंगुर्ले पर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. ही योजना जवळपास २४ वर्षांनंतर मार्गी लागणार आहे.
या योजनेतून सावंतवाडी तालुक्यातील दांडेली या ठिकाणी पाणी साठवून ते पाणी कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून यासाठी आंदोलन छेडले होते. त्यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी एका बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींना या योजनेतून पाणी रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासन दिले होते. यावेळी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना योजना आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले होते. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर मध्ये या योजनेचा आराखडा तयार केला आणि तो मंजुरीसाठी पाठविला आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील जीवन प्राधीकरणला पत्रव्यवहार यासाठी केला होता.
दांडेली ते मळगाव कोकण रेल्वे स्टेशन या ९ किलोमीटर अंतरावर पाईपलाइनद्धारे पाणी आणले जाणार आहे. लोखंडी पाईप लाईन टाकून मळगाव रेल्वे स्थानकावर अडीच लाख लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या टाकीत साठवून ठेवले जाईल. यासाठी साडेसात कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे तसेच या योजनेतून मळगाव, कुंभार्ली व माजगाव या तीन गावांना पुरक नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होईल. याच योजनेतून पाणी पुरवठा विस्तारित योजनेतून करण्यासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली पाहिजे. यासाठी या योजनेचा आराखडा आठ कोटी ५० लाख रुपयांचा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विकास अंतर्गत निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शवली नाही तर आपण सिंधुरत्न योजनेतून आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते.
दरम्यान डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा आराखडा मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे त्यामुळे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील मळगाव रेल्वे स्थानकावर पाणी पुरवठा होईल आणि सर्व गाड्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर थांबतील यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.