
सावंतवाडी : शहरातील भटवाडी परिसर सध्या पूर्णपणे दुर्लक्षित झाला असून, येथील गटार आणि रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यातच आता नळ कनेक्शनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार हे खड्डे केवळ मातीने बुजवून मोकळे होत असल्याने, अपघातांची शक्यता वाढली आहे.
याबाबत जाब विचारल्यास, ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. भटवाडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन नाही. गटार आणि रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. त्यातच आता नळ कनेक्शनसाठी खोदलेले खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. हे खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याने, अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी तर हे खड्डे अधिकच धोकादायक ठरत आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांनी ठेकेदारांना विचारणा केली असता, "आम्ही खड्डे खोदण्यासाठी नगरपरिषदेत पैसे भरले आहेत, त्यामुळे तुम्ही नगरपरिषदेला जाऊन विचारा, आमचा काही संबंध नाही," असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. ठेकेदारांच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सावंतवाडी शहरातील इतरही काही वॉर्डमध्ये अशीच परिस्थिती असल्याने, सध्याची ही गंभीर परिस्थिती अपघातांना निमंत्रण देणारी ठरणार आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन, नगरपरिषदेने लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि येथील नागरिकांना सहकार्य करावे, अशी विनंती 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'कडून सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पाटील यांना करण्यात आली आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रतिष्ठानने दिला आहे.