हायवेवर मासे वाहतूक करणारी पिकअप पलटी

चालकाचे प्रसंगावधान ; चार दुचाकीस्वारांचे वाचले प्राण
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 19, 2025 10:03 AM
views 236  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पीठढवळ पुलावर आज सायंकाळी भीषण अपघात झाला. रत्नागिरीहून गोव्याच्या दिशेने मासे घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक: MH 08 AP 3821) पुलावर पलटी झाली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी चालक किरकोळ जखमी झाला आहे.

आज सायंकाळी ४:५० वाजण्याच्या सुमारास ही पिकअप गाडी रत्नागिरीहून मासळी घेऊन गोव्याकडे जात होती. पिटढवळ पुलावर येत असताना चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. याच वेळी समोरून चार दुचाकीस्वार येत होते. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग आणि वळणामुळे गाडी महामार्गावरच पलटी झाली.

गाडी अनियंत्रित झालेली असतानाही चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे समोरून येणाऱ्या चार दुचाकीस्वारांचे प्राण वाचले आहेत. चालकाने गाडी बाजूला वळवल्याने दुचाकींना धडक बसली नाही. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. 

मदतीसाठी धावले लोकप्रतिनिधी आणि नागरिक

अपघात झाल्याचे समजताच महामार्गावरून जाणारे नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये  निखिल कांदळगावकर (आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक)  समिल जळवी (पत्रकार)  आणि अन्य ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला मदत केली आणि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.