
सिंधुदुर्गनगरी : “ज्या हातात पुस्तक, पेन आणि तिरंगा असायला हवा, तो हात व्यसनाकडे जाणे हे स्वातंत्र्याला काळिमा फासणारे आहे,” असा परखड संदेश देत सरपंच सुशील कदम यांनी तरंदळे येथील युवक व विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, व्यायाम आणि कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, सदस्य तेजस सावंत,दीपक घाडी, नेहा घाडी , मुख्याध्यापक डोईफोडे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ तसेच ब्लू स्टार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत तरंदळे आणि जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुशील कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर जि.प. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीमधील प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसह दहावी व बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कदम यांनी युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त केली. मोबाईल, दारू, तंबाखू व गुटख्याच्या आहारी जाणाऱ्या तरुणांनी वेळीच सावध व्हावे, असे आवाहन करत “व्यसन माणसाला आतून पोखरते. व्यायाम करा, अभ्यास करा आणि कौशल्य आत्मसात करा,” असा संदेश त्यांनी दिला. व्यसनमुक्त, सुशिक्षित आणि देशभक्त युवा पिढी घडविण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक ती कठोर पावले उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी शाळांची घटती पटसंख्या यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “मराठी शाळा वाचवायच्या असतील तर प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेतच प्रवेश द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समितीच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. उपसरपंच शुभावली सावंत यांनी मुलींनी सर्व क्षेत्रांत आघाडी घेण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा माळकर यांनी शासकीय शैक्षणिक योजनांची माहिती दिली.










