दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : सीईओ रवींद्र खेबुडकर

जि. प.त दिव्यांग - अव्यंग योजनेच्या लाभार्थ्यांना निधीचे वितरण
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 24, 2025 14:49 PM
views 86  views

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदरच्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आर्थिक उन्नती साधू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व आहे म्हणून खचून न जाता त्यावर मात कशी करता येईल. यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले. 

यावेळी ते जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या "दिव्यांग - अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन' च्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब, विस्तार अधिकारी आत्माराम परब, वरिष्ठ सहाय्यक समिधा ठाकूर, कनिष्ठ सहाय्यक सुबोध गोसावी, कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) कोमल पाटील, कनिष्ठ सहाय्यक अनिता खूपसे उपस्थित होते.

पुढे श्री. खेबुडकर यांनी उपस्थित दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे दिव्यांग - अव्यंग विवाहित जोसप्यांचा सत्कार करत असताना प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. तसेच प्रत्येक दिव्यांग व्यक्तीशी चर्चा करून व्यवसायाची माहिती घेतली. यावेळी दिव्यांग व्यक्तींबरोबर विवाह करणाऱ्या अव्यंग व्यक्तिंचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील असा विश्वास देखील त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिला. 

दरम्यान यावेळी दिव्यांग व्यक्तींच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे आभार व्यक्त करताना स्वप्नील लातये म्हणाले, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची वैयक्तिक बोलून माहिती घेणारे, मार्गदर्शन करणारे, तसेच समस्या जाणून घेणार अधिकारी श्री. खेबुडकर यांच्या रूपाने देवच उभा राहिला. श्री. खेबुडकर सरांनी ज्या प्रमाणे आमच्याशी चर्चा केली तशी याआधी कोणत्याच अधिकऱ्यांनी अशी चर्चा केली नव्हती. समस्या देखील जाणून घेतल्या नव्हत्या. मात्र श्री. खेबुडकर सर त्याला अफवाद ठरले. समाजात जे खरोखर दिव्यांग लोक आहेत ते व्यंग दाखवण्यासाठी घाबरत आहेत. काहींना वेगळं वाटत. मात्र कोणीही खचून जाऊ नये. समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला तरी तो बदलण्याची ताकद आपल्यात आहेत. त्यामुळे कोणीही खचून जाऊ नका. व्यवसाय, उदयोग जे काही करायचे असेल ते बिनधास्तपणे केलं पाहिजे. प्रशासन देखील आपल्याला सहकार्य करणार आहे, त्यातच श्री. खेबुडकर सरांसारखे अधिकारी आपल्याला सहकार्य करायला भेटले तर कोणीच व्यक्ती शासकीत योजनांच्या लाभांपासून दूर रहाणार नाही, अशा शब्दात श्री. लातये यांनी आभार मानले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांच्याहस्ते दिव्यांग - अव्यंग विवाह प्रोत्साहन च्या पात्र दहा लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधी वितरित करण्यात आला.

यावेळी प्रियांका अरुण बीडीये - हनुमंत मुकुंद पालव, साक्षी बाळसाहेब राजमाने - सुशांत संभाजी कोरे, नयना सदाशिव नाईक - प्रवीण नारायण शेडगे, माया लक्ष्मण पेंडुरकर - विशाल विश्वनाथ डिकवलकर, दीप्ती भाऊ सुतार - मयुर मंगेश ठाकूर, ऐश्वर्या दिनकर नारकर - योगेश लक्ष्मण खोचरे, माधुरी रवींद्र डगरे - नयन उदय माधव, रूपाली शशीशेखर तावडे - मंगेश सहदेव दळवी, मृणाल मंदार चिंदरकर -  मनोज मारुती सरंबळकर, शिल्पा शरद राऊळ - स्वप्निल संतोष लातये या लाभार्थ्यांना दिव्यांग - अव्यंग विवाह प्रोत्साहन वितरित करण्यात आला. 

दरम्यान जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच समारोपावेळी शासना मार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा दिव्यांग व्यक्तींनी देखील घ्यावा. काही शासकीय मदत लागली तर जिल्हा प्रशानाच्या माध्यमातून केली जाईल, असा विश्वास दिला.