राणेंप्रमाणे डावखरेंना जनता साथ देईल : रत्नाकर जोशी

Edited by:
Published on: June 24, 2024 13:44 PM
views 90  views

मालवण : गेले दोन टर्म कोकण पदवीधर मतदार संघांचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. महायुती मधील घटक पक्ष म्हणून शिवसेनेने व युवासेनेने गेले पंधरा दिवस जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबवली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने भाजपचे उमेदवार खास. नारायण राणे यांना साथ दिली तशीच साथ भाजपचे आम. डावखरे यांना जनता देईल आणि विरोधी उमेदवार रमेश किर यांना बाजूला सारून आम. डावखरे यांना पहिल्या क्रमांकाची पसंती देईल, त्यामुळे आम. डावखरे हे तिसऱ्यांदा विजयी होतील, असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे सध्या जी काही वक्तव्य करत आहेत ती त्यांची वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचेही त्यांनी जोशी यांनी सांगितले. मालवण येथील मिनी मालवण हॉटेल मध्ये शिवसेना पक्षाच्या जिल्हा युवासेनेची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी हे बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाध्यक्ष सौ. सोनाली पाटकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवतीसेना तालुकाप्रमुख गायत्री ढोलम, शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, मेहुल धुमाळे, आदित्य राणे, दाजीबा कुबल, नितेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी रत्नाकर जोशी म्हणाले, कोकण पदवीधर मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आम. निरंजन डावखरे यांना अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. डावखरे यांना पदवीधर आमदार म्हणून दोन टर्मचा अनुभव आहे. आम्ही गेले पंधरा दिवस प्रचार यंत्रणा राबवत असून डावखरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे, असेही श्री. जोशी म्हणाले. 

कोकण पदवीधर मतदार संघात अडीज लाख पदवीधर मतदार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ हजार मतदार तर मालवण कुडाळ मतदार संघात १८०० मतदार आहेत. मालवण कुडाळ सह जिल्ह्यात मतदारांची संख्या कमी आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत जनजागृती करूनही नवीन मतदार नोंदणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, महिन्याभरापूर्वीच लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने याकडे आमचेही दुर्लक्ष झाले हे आम्ही मान्य करतो, मात्र यापुढे पदवीधर मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असेही रत्नाकर जोशी यांनी सांगितले. तसेच माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत हे सध्या जी काही वक्तव्ये करीत आहेत, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांचे विचार ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही, त्यांच्या मतांशी पक्षाचे देणेघेणे नाही, असेही यावेळी रत्नाकर जोशी यांनी स्पष्ट केले.