उपजिल्हा रुग्णालयातील रखडलेले प्रश्न मार्गी !

युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकीचा पाठपुरावा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2025 11:10 AM
views 103  views

सावंतवाडी : सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील अनेक वर्ष रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. युवा रक्तदाता संघटना - सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून यासाठी यशस्वी पाठपुरावा करण्यात आला‌ होता. यातील जुन्या आणि नव्या इमारतीमधील स्वच्छतागृह व जीर्ण झालेले ड्रेनेज दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी, प्रशासन व दोन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले.  

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीमधील स्वच्छतागृह व ड्रेनेज ची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सात लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजित खर्चासह जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले यांच्याकडे मागणीपत्र सादर केले होते. बरीच वर्ष हा प्रश्न रखडला होता.यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे ही लक्ष वेधले होते.

अखेर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासनदरबारी आग्रही पाठपुरावा करण्यात आला. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी रुग्णालयाचे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना हे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मंजूर झाला. पहिल्या टप्प्यात स्वच्छतागृह व ड्रेनेज दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. याची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार रूग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, मेहर पडते, ॲड.प्रथमेश प्रभू, प्रसाद गवळी, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने निधीला मंजुरी दिली होती.यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे आभार व्यक्त केले आहेत.