
कणकवली : चालत रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीची धडक बसल्याने सुभाष तुकाराम कदम (५३, रा. हळवल - रमाबाई आंबेडकर नगर) हे जखमी झाले आहेत. हा अपघात हळवल येथेच मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
सुभाष हे जानवली येथील सापळे शोरूम येथे काम करतात. सायंकाळी काम संपवून ते घरी जात होते. घराजवळ रस्ता ओलांडत असताना कणकवलीहून कळसुलीच्या दिशेने जाणाऱ्या निळ्या रंगाचा दुचाकीची त्यांना धडक बसली. यात ते रस्त्यावर पडून डोक्याला, हाताला व पायाला दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने दुचाकीसह तेथून पलायन केले. याबाबत सुभाष यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात दुचाकीस्वारावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













