
कुडाळ : श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा दोन गटात वाचनालयाचे अध्यक्ष परशुराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात सैन्यामध्ये उत्तम प्रकारे सेवा दिलेल्या व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कॅप्टन बबनराव खोचरे, माजी सेनानी शिवराम गणेश जोशी व उद्घाटक माजी सैनिक चंद्रशेखर शिवराम जोशी आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी सैनिक पतपेढीने ५ हजार रुपयांचे भरीव आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव एकनाथ केसरकर यांनी केले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या पहिल्या गटात ७ शाळांनी तर सहावी ते आठवीच्या दुसऱ्या गटात पाच शाळांनी सहभाग घेतला. यावेळी वाचनालयाचे संचालक स्नेहल माळकर-फणसळकर, शाम पावसकर, दादा कोरगावकर, विजय केसरकर, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने पालक तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. परीक्षक विजय सावंत व रघुवीर परब यांनी यशस्वीपणे काम केले. पहिली ते पाचवीच्या गटामध्ये श्री. वा. स. विद्यालय, माणगाव प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला तर अनुक्रमे प्राथमिक शाळा माणगाव नं.२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगाव व प्राथमिक शाळा माणगाव नंबर १ यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली.
गट क्रमांक दोन सहावी ते आठवीमध्ये श्री. वा. स. विद्यालय, माणगाव यांनी प्रथम, द्वितीय माणगाव नंबर २, तृतीय साळगांव नंबर एक व उत्तेजनार्थ माणगाव नंबर २ यांनी प्राप्त केले. संगीत साथ काही शाळांतील विद्यार्थ्यांनी केली. यात शर्मिला धर्णे, हेरंब घाटकर व भार्गवी काशीद हार्मोनियमवर संगत दिली. वाचनालयाचे अध्यक्ष पी. बी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थितांचे व सहभागी शाळांचे कौतुक करून आभार मानले.
