LIVE UPDATES

कुडाळमधील 'मच्छिन्द्रनाथ कांबळी' नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

आ. निलेश राणे यांच्याकडून साडेतेरा कोटींचा निधी मंजूर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 20, 2026 16:14 PM
views 59  views

कुडाळ : सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या कै. मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे गेली चार वर्षे निधीअभावी रखडलेले काम आता अखेर मार्गी लागणार आहे. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विशेष पाठपुरावा करून या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी १० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून, पुढील ८ ते ९ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी २०२७ पर्यंत हे सुसज्ज नाट्यगृह रंगकर्मी आणि नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास रंगकर्मी तथा स्थापत्य अभियंता केदार सामंत यांनी व्यक्त केला आहे.

शासनाच्या धोरणानुसार जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह उभारणे आवश्यक असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हे नाट्यगृह ओरोस येथे मंजूर झाले होते. मात्र, तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ते कुडाळ येथे उभारण्याचे निश्चित झाले आणि कामही सुरू झाले. परंतु, एका टप्प्यावर येऊन हे काम रेंगाळले आणि गेली चार वर्षे पूर्णपणे रखडले होते.

यादरम्यान प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव आणि प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी येथे नाटक सादर करण्याच्या दृष्टीने काही तांत्रिक त्रुटी असल्याकडे लक्ष वेधले होते. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार निलेश तेंडुलकर यांनी ही बाब तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर या त्रुटी दूर करण्याच्या कामाला गती मिळाली.

या तांत्रिक त्रुटींवर तोडगा काढण्यासाठी रंगकर्मी व स्थापत्य अभियंता केदार सामंत यांनी राज्याच्या मुख्य वास्तुविशारद श्रीमती देशपांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नाट्यगृहाचे आधी झालेले काम प्रेक्षकांच्या दृष्टीने उत्तम असले, तरी नाटक सादर करताना रंगमंचाची (स्टेज) खोली कमी पडत होती. त्यामुळे व्यावसायिक नाटकांचे मोठे सेट लावण्यात अडचणी निर्माण होऊन, तिथे केवळ एकांकिका किंवा मंगल कार्यालयासारखेच कार्यक्रम होऊ शकले असते.

कलाकारांची ही अडचण ओळखून आता रंगमंचाची खोली वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रेक्षकांची केवळ एक रांग कमी करावी लागणार असून, यामुळे फक्त २२ जागा कमी होतील. तरीही या नाट्यगृहाची आसनक्षमता ६२० प्रेक्षक सामावून घेण्याची असेल. सुधारित प्लॅन्सनुसार आता मोठ्या व्यावसायिक नाटकांच्या सादरीकरणात कोणतीही अडचण येणार नसल्याने रंगकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेली चार वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला आमदार निलेश राणे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. आ. राणे यांनी या विषयात स्वतः जातीनिशी लक्ष घालून साडेतेरा कोटींचा निधी आणला. निधी अभावी थांबलेले काम आता युद्धपातळीवर सुरू होणार असून, फेब्रुवारी २०२७ पर्यंत कुडाळकरांची बंदिस्त नाट्यगृहाची अनेक वर्षांची उणीव दूर होणार आहे. कुडाळ हे सिंधुदुर्गचे सांस्कृतिक केंद्र असल्याने, या सुसज्ज नाट्यगृहामुळे जिल्ह्यातील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना हक्काचे व्यासपीठ मिळणार यात शंका नाही.