
दोडामार्ग : मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली पासपोर्ट संदर्भातील मुलाखतीची प्रक्रिया गोवा येथे पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी केली आहे. नानचे यांनी संदर्भातील एक निवेदनही मंत्री राणे यांच्या कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी भेट घेत सादर केले आहे. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे असे सुतोवाच केले आहेत.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यातील अनेक युवक युवती वेगेवगेळे कोर्सेस करून विदेशात रोजगार, पर्यटन व शिक्षणासाठी जातात. आणि परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्वाचा पासपोर्ट लागतो. हा पासपोर्ट मिळविण्यासाठी यापूर्वी मुंबईत जावे लागायचे. त्या ठिकाणाच्या कार्यालयात कागद पत्रांची पडताळणी व मुलाखत होत असे. त्यानंतर ही प्रक्रिया नागरिकांच्या सोयीसाठी गोवा राज्यातील पणजी येथील पासपोर्ट कार्यालयात सुरू करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांना गोव्यात जाऊन कागद पत्रांची पडताळणी व मुलाखत देणे सोयीस्कर पडत होते. मात्र आता ही गोव्यात होणारी प्रक्रिया महाराष्ट्र नागरिकांसाठी बंद करण्यात आलेली असून परत एकदा ही प्रक्रिया मुंबई येथे घेण्यात येत आहे. ते खूपच खर्चिक व वेळेचा अपव्यय होण्यासारखे आहे. एकतर ही प्रक्रिया सिंधुदुर्गात सुरू करावी अन्यथा गोव्यातील पणजी येथील कार्यालयात पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील सिंधुदुर्गवासियांची आहे. तरी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही प्रक्रिया आपल्या माध्यमातून सुरू करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्गात लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरू होणार : नितेश राणे
दरम्यान मंत्री राणे म्हणाले की, तुम्ही केलेली मागणी ही सिंधुदुर्गवासीयांसाठी गरजेची आहे. आपल्या भागाचे माजी केंद्रीय मंत्राई तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जिल्हावासियांनासाठी सुरू करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. येणाऱ्या काळात लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत घेण्याचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच मंत्री राणे यांनी संतोष नानचे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.