मळगाव येथे पुण्याच्या प्रवाशांची रिक्षा चालकाला मारहाण ; स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

तणावपूर्ण वातावरणात प्रकरण पोलीस स्थानकात
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 01, 2023 19:00 PM
views 509  views

सावंतवाडी : सावंतवाडी - रेडी मार्गावर झाराप पत्रादेवी बायपासच्या मुख्य बॉक्सवेल लगत गोवा येथून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या मर्सिडीज गाडीची धडक सावंतवाडीतून तळवडेच्या दिशेने जाणाऱ्या सहाआसनी रिक्षाला बसली. यानंतर उलटपक्षी मर्सिडीजमधील पर्यटकांनी सहाआसनी रिक्षा चालकाला मारहाण केली. त्यानंतर त्याला आपल्या गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून त्याला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनाही सदर पर्यटकांनी मारहाण केली. या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी गाडी रोखून धरत संबंधितांना जाब विचारला.

 मात्र त्यानंतरही ते उडवाउडवीची भाषा करू लागल्याने जमाव अधिकच संतप्त झाला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने संबंधितांनी जाहीर माफी मागावी व रिक्षाचालकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी केली. रिक्षाचालकाला मारहाण केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे मळगाव येथे ताण-तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

प्रकरण शांत होत नसल्याचे लक्षात येताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमाव आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर संबंधित पर्यटकांना पोलीस बंदोबस्तात सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणाबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. रिक्षाचालकाला मरहाण करणारे लोकप्रतिनिधीचे नातेवाईक असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.