
कुडाळ : सिंधुदुर्गात मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकारण पूर्ण झाल्यावर प्रत्येक गावात प्रवासी निवारा शेड बांधण्यात आल्या. जेणेकरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या निवारा शेडचा फायदा होईल. या शेड्सचा फायदा प्रामुख्याने एसटी बस प्रवासी किंवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना क्षणभर विश्रांतीसाठी होतो. पण या प्रवासी निवारा शेड बांधून दोन - तीन वर्षेच झाली असतील. मात्र, या निवारा शेडची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या शेड बाहेरून सुस्थितीत दिसत असल्या तरी आता कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. एकंदरीत निवारा शेडची स्वच्छता करणे हे महामार्ग ठेकेदार कंपनीचे काम आहे. परंतु, ठेकेदार कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
निवारा शेडमध्ये दारू बॉटल, प्लास्टिक पिशव्या
या निवारा शेडमध्ये प्रामुख्याने, माती, प्लास्टिक बॉटल्स, दारूच्या बॉटल्स, सिगारेट, गुटखा, पॉपकॉर्न पाकिटे यांचा कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. हा कचरा महामार्ग ठेकेदार कंपनीकडून उचलला जाणे आवश्यक आहे. पण, ठेकेदार कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
निवारा शेडमध्ये जाहिरात पोस्टर अधिक
या शेडमध्ये जाहिरातींची पोस्टर चिकटवून ठेवण्यात आली आहेत. तर ही पोस्टर फाडून याचा कचरा सुद्धा येथेच टाकण्यात येतो. मात्र, याकडे ठेकेदार कंपनी असो वा सामान्य नागरिकाला काही नसल्याचे दिसून येत आहे. त्याव्यतिरिक्त शेडमधील बसण्याच्या जागेवर धूळ साचली असून प्रवाशांना उभेच राहावे लागत आहे.
शेडमध्ये रात्रीस खेळ चाले !
या शेडसमध्ये रात्रीच्या वेळी मद्यपी व्यक्ती बसल्याचे आढळून येते. या मद्यपी व्यक्तींकडून या सीड्स मध्ये दारूच्या बाटल्या प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे. तसेच येथे मध्यरात्रीपर्यंत काही तरुण बसलेले असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सुद्धा अशा व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच महामार्ग प्रशासन ठेकेदार कंपनीने सुद्धा या शेड स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.