
सिंधुदुर्ग : पुणे येथे १०, ११ जानेवारीला होणाऱ्या भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या अधिवेशनात 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'चे अध्यक्ष व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत कोकणातील महापाषाण संस्कृतीकालीन एका महत्वपूर्ण नवीन संशोधनावर शोधनिबंध सादर करणार आहेत.
भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन संस्था (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल - आयएसएआरसी) ही संस्था भारतीय मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, पुरातत्व, प्रागैतिहासिक कला, पाषाणकला या क्षेत्रात संशोधन कार्य करते. तसेच या विषयात काम करणाऱ्या देशभरातील संशोधकांना व्यासपीठ मिळण्यासाठी गेली चार वर्षे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करते. गेल्या वर्षी संस्थेचे चवथे राष्ट्रीय अधिवेशन निलंगा येथे झाले होते. या अधिवेशनात श्री. लळीत यांनी 'कातळशिल्पांमध्ये आढळलेला मातृदेवता संकल्पनेचा उगम' या विषयावर शोधनिबंध सादर केला होता.
यावर्षी परिषदेचे पाचवे अधिवेशन १० व ११ जानेवारी २०२५ला पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत श्री. लळीत कोकणातील एका नव्या पुरातत्वीय संशोधनावर शोधनिबंध सादर करणार आहेत.